ठाणे स्थानकातील एटीव्हीएम बंद; दुरुस्तीकडे रेल्वे प्रशासनाची डोळेझाक

ठाणे रेल्वे स्थानकातील ‘एटीव्हीएम’(ऑटोमेटीक टिकिट व्हेन्डींग मशीन) सेवा बंद पडल्याने प्रवाशांचे हाल होऊ  लागले आहेत. सुट्टीत प्रवाशांची संख्या वाढत असताना ठाणे स्थानकातील २३ पैकी १० यंत्रे अनेक महिन्यांपासून बंद आहेत.  त्यामुळे उरलेली यंत्रे आणि तिकीट खिडक्यांवर प्रवाशांच्या रांगा लागत आहेत.

मध्य रेल्वेच्या मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या ठाणे स्थानकातील प्रवाशांना तिकिटांसाठी रांगांमध्ये ताटकळत उभे रहावे लागू नये यासाठी स्मार्ट कार्ड योजना अर्थात एटीव्हीएम मशीन्सचा पर्याय रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आला होता. मात्र या यंत्रांपैकी बहुतेकांवर ‘आऊट ऑफ सव्‍‌र्हिस’ असा संदेश झळकत आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता या यंत्रांमध्ये वापरले जाणारे फोबर्स कंपनीचे सुटे भाग संबंधितांनाबाजारात उपलब्ध होत नसल्याने ही यंत्रणा सतत बंद पडत असल्याची माहिती मिळाली. एकाचवेळी अनेक यंत्रे बंद पडल्यास एकाच यंत्रावर ताण पडत असल्याचे चित्र स्थानक परिसरात दिसून येते. त्यामुळे प्रवासी वैतागून लोकल तिकिटाचा पर्याय स्वीकारत आहेत. मात्र तिकीट खिडक्यांसमोरही भल्या मोठय़ा रांगा लागत असल्याने प्रवासी जनरल तिकीट बुकिंग सव्‍‌र्हिसचा पर्याय निवडत आहेत. यामध्ये खासगी एजंटकडून एका तिकिटामागे अतिरिक्त एक रुपया देऊन प्रवासी लोकल तिकीट काढतात.

तिकिटांचे विविध पर्याय उपलब्ध असले तरी एटीव्हीएमवरून तिकीट काढणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. त्यामुळे या सेवेसाठी ताटकळत बसण्याची वेळ प्रवाशांवर येऊ नये.

नंदकुमार देशमुख, प्रवासी संघटना