२८ ऑगस्टला निवडणूक; डिम्पल मेहता यांचे नाव आघाडीवर

मीरा-भाईंदर महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर भाजपकडून महापौरपदासाठी कोणाला उमेदवारी दिली जाते याबाबत आता राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. येत्या २८ ऑगस्टला महापौरपदासाठीची निवडणूक होणार आहे. आमदार नरेंद्र मेहता यांच्या नातलग असलेल्या डिम्पल मेहता यांचे नाव महापौरपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे.

महापालिकेच्या विद्यमान महापौरांची २७ ऑगस्टला मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे नव्या महापौर निवडीसाठी २८ ऑगस्टला ही निवडणूक घेण्यात येत आहे. यावेळचे महापौरपद इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असल्याने सलग तिसऱ्यांदा महापौरपदी महिला विराजमान होणार आहे. ९५ पैकी ६१ जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता स्थापन केल्यानंतर पक्षातून या पदासाठी कोणाला उमेदवारी दिली जाते याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यात मेहता यांच्या बंधूंची पत्नी डिम्पल मेहता यांचे नाव आघाडीवर आहे. मेहता या मीरा रोडमधील प्रभाग १२ मधून निवडून आल्या असून त्या इतर मागासवर्गीय प्रवर्गातल्या आहेत. आधीच्या महापालिकेत त्या भाईंदर पूर्व येथून निवडून गेल्या होत्या आणि त्यांनी महिला बालकल्याण समितीचे सभापतिपदही भूषवलेले आहे. त्यामुळे मेहता यांनाच महापौरपदासाठी पहिली पसंती दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

डिम्पल मेहता यांच्यापाठोपाठ वरिष्ठ नगरसेविका प्रभात पाटील यांचेही नाव घेतले जात आहे. प्रभात पाटील या सलग सहा वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे पाटील सर्वात वरिष्ठ नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. याआधी त्या काँग्रेस पक्षातून निवडून येत होत्या. मात्र निवडणुकीच्या आधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. महापौरपदासाठी ज्येष्ठता हा निकष लावायचा झाल्यास प्रभात पाटील यांचे नाव सर्वात आधी आहे, परंतु भाजपमध्ये त्या नुकत्याच आल्या असल्याने त्यांना महापौरपद मिळेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

खारीगावातून निवडून आलेल्या वंदना पाटील यादेखील महापौरपदाच्या शर्यतीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वंदना पाटील या गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आल्या होत्या, परंतु गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून त्या भाजपच्या संपर्कात होत्या. त्यामुळेच त्यांना या वेळी भाजपने उमेदवारी दिली. त्यांनी मतेही चांगली घेतली आहेत. त्यामुळेच वंदना पाटील यांचेही नाव या पदासाठी चर्चेत आहे. याव्यतिरिक्त इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आणखी सात महिला भाजपमधून निवडून आल्या आहेत, परंतु त्या पक्षात नव्या आहेत तसेच यातील एखाद्दुसरा अपवाद वगळता उर्वरित पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. त्यामुळे महापौरपदासाठी डिम्पल मेहता, प्रभात पाटील आणि वंदना पाटील यांच्यातच चुरस आहे.