ठाण्याच्या महापौरांचा पालिका प्रशासनावर आरोप
ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांमधील सुमारे २५० धोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले असतानाच महापौर संजय मोरे यांनी मात्र इमारती धोकादायक ठरविण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत इमारती सरसकट रिकाम्या करू नका, असे आदेश मंगळवारी प्रशासनाला दिले. शहरातील अनेक भागांमधील धडधाकट इमारतींमधील रहिवाशांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. तसेच श्रीनगर भागातील ४५ इमारतींना ‘नजरचुकीने’ धोकादायक ठरविण्यात आल्याची कबुली खुद्द महापालिका अधिकाऱ्यांनीच आपल्याकडे दिली आहे, असा खळबळजनक आरोपही महापौरांनी केला. हा प्रकार वेळीच आवरा आणि इमारतींचे पुनर्परीक्षण केल्याशिवाय रहिवाशांना बेघर करू नका, असा घरचा आहेर महापौरांनी आयुक्तांना दिला आहे.
श्रीनगर परिसरातील तब्बल ४५ इमारतींना महापालिकेने अशाच स्वरूपाच्या नोटिसा धाडल्या असून या सर्व इमारती केवळ पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या बिल्डरच्या दबावामुळे रिकाम्या केल्या जात आहेत, असा आरोप या भागातील स्थानिक नगरसेविकेने केल्याने या प्रकरणातील संशयाचे धुके आणखी गडद बनले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची तपासणी करून त्यांची यादी तयार करण्यात येते. यातील अतिधोकादायक इमारती तोडण्याची कार्यवाही प्रशासनाकडून केली जात आहे. वर्तकनगर परिसरातील दोन इमारतींच्या दुरुस्तीसाठी वर्षभरापूर्वी तब्बल ७० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता. असे असताना वर्षभरातच त्या धोकादायक ठरविण्यात आल्याने अभियांत्रिकी विभाग चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर इमारतींचे पुनर्परीक्षण केल्याशिवाय रहिवाशांना बेघर करू नका, असे आदेश महापौर संजय मोरे यांनी मंगळवारी दिले. या मुद्दय़ावरून रहिवाशांमध्ये कमालीची खदखद असूनही एकाही राजकीय नेत्याने आतापर्यंत ब्रदेखील उच्चारला नव्हता. असे असताना महापौर मोरे यांनी इमारत धोकादायक ठरविण्याच्या प्रक्रियेवर बोट ठेवत थेट जयस्वाल यांना अंगावर घेतल्याची चर्चा रंगली आहे.
काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेच्या हद्दीतील धोकादायक नसलेल्या इमारतींना पालिका प्रशासनाकडून धोकादायक ठरवून नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी स्पष्ट भूमिका महापौरांनी घेतली आहे. श्रीनगर येथील नगसेविका मनप्रीत कौर यांनी या विभागात महापालिका प्रशासनाकडून धोकादायक नसलेल्या इमारतींनाही नोटिसा पाठवल्याची बाब उघड केली आहे. या प्रकरणी आपण संबंधित अधिकाऱ्यांना या विषयी विचारणा केली असता ‘नजरचुकी’मुळे अशा नोटिसा बजावल्या गेल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिल्याचा खळबळजनक आरोपही महापौरांनी केला आहे.

विश्वासात घेऊन कारवाई करा
ठाण्यातील नागरिकांनी महापालिकेच्या प्रत्येक विकासकामामध्ये सहकार्य आणि योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या इमारतींवर कारवाई करताना येथील नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या पुनर्वसनाबद्दलचे निर्णय घेण्यात यावेत. त्यानंतरच ही कारवाई करण्यात यावी. प्रशासनाकडून चुकीच्या पद्धतीने बजावण्यात आलेल्या नोटिशीसंदर्भात योग्य खुलासे करण्यात यावेत, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच आयुक्तांच्या स्तरावर या संदर्भात मार्गदर्शन करण्याचेही महापौरांनी कळवले आहे.