महापालिका प्रशासनामार्फत प्रकल्प अहवालाचे काम सुरू

वाढत्या प्रवासीसंख्येच्या तुलनेत ठाणे परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ा अपुऱ्या पडू लागल्याने महापालिका प्रशासनाने आता सार्वजनिक वाहतुकीसाठी नवा पर्याय म्हणून शहरांतर्गत मेट्रो रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी तांत्रिक सुसाध्यता व प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. या कामामुळे येत्या काही वर्षांत शहरात वर्तुळाकार (रिंगरुट) मार्गावर मेट्रो रेल्वेसेवा सुरूहोण्याची चिन्हे असून या सेवेमुळे ठाणेकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठाणे महापालिकेच्या विकास आराखडय़ामध्ये हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट मार्गासाठी (एचसीएमटीआर) २१.५० किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित आहे. हा संपूर्ण मार्ग शहराभोवती वर्तुळाकार असून या मार्गावर रेल्वेसेवा सुरूकरण्याचा प्रस्ताव अनेकदा चर्चेत आला. मात्र, चर्चेव्यतिरिक्त काहीच झाले नाही. असे असतानाच आता याच मार्गावर मेट्रो रेल्वेसेवा सुरूकरण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

गेल्या काही वर्षांत ठाणे शहराचे मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले. त्यामुळे शहराची लोकसंख्या २० लाखांच्या पुढे गेली आहे. या लोकसंख्येच्या तुलनेत शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी ठाणे परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी ठाणेकरांना रिक्षा तसेच बेकायदा धावणाऱ्या खासगी बसचा पर्याय उपलब्ध असला तरी सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने टीएमटीवगळता अन्य पर्याय उपलब्ध नाही. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी आता मेट्रो रेल्वेसेवा सुरूकरण्याच्या दृष्टीने हालचाली सुरूकेल्या आहेत.

ही सेवा प्रत्यक्षात सुरू करता येऊ शकते का, याची चाचपणी करण्यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. या प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेने मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मेट्रो रेल्वेसेवा प्रकल्पाचा तांत्रिक सुसाध्यता व प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम महामेट्रोमार्फत करण्यात येणार आहे. या कामासाठी तीन कोटी ५४ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

११ स्थानके उभारणार

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत आंतरशहर मेट्रो मार्ग तयार करण्यात येणार असून यामध्ये ठाण्यातील मॉडेला चेकनाका ते कासारवडवली असा १०.६० किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित केला आहे. या मार्गावर ११ स्थानके उभारण्यात येणार आहेत. याशिवाय, कापूरबावडी-भिवंडी-कल्याण असा मार्गही प्रस्तावित करण्यात आला आहे. हे दोन्ही मार्ग कापूरबावडी येथे एकत्र येणार आहेत. त्यापाठोपाठ आता शहरातील अंतर्गत मार्गावर वर्तुळाकार पद्धतीने मेट्रो रेल्वेसेवा सुरूकरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीसाठी नवा पर्याय उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दूर राहणाऱ्यांना लाभ

ठाणे स्थानकापासून किमान पाच किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर असलेल्या आणि महामार्गाच्या पलीकडे असलेल्या वागळे इस्टेट, पोखरण रस्ता क्रमांक १ व २ आणि मानपाडा या भागाचे मोठय़ा प्रमाणात नागरिकरण झाले आहे. या भागातील नागरिक टीएमटी बस किंवा शेअर रिक्षाने प्रवास करतात. या भागातील प्रवाशांची संख्याही मोठी आहे. या प्रवाशांसाठी शहरांतर्गत मेट्रो रेल्वेसेवा उपयुक्त ठरू शकेल, असे महापालिकेने प्रस्तावात म्हटले आहे.