कावेसर येथील भूखंडावर आधी बांबू, ताडपत्रीचे देवालय, मग पुजाऱ्याचाही संसार

मुंबई, ठाण्यात परवडणाऱ्या घरांसाठी पुरेशी जमीन उपलब्ध नसल्याचे सांगणाऱ्या राज्य सरकारच्या जमिनी विविध प्राधिकरणांच्या दुर्लक्षामुळे कशा बळकावल्या जात आहेत, याचे उत्तम उदाहरण ठाण्यातील घोडबंदर भागातून समोर आले आहे. कावेसर येथील म्हाडाच्या मालकीच्या भूखंडावर गेल्या काही महिन्यांपासून एक धार्मिक स्थळ उभारण्यात आले असून सध्या बांबू व ताडपत्रीच्या अवस्थेत असलेल्या या धार्मिक स्थळाच्या ‘कारभाऱ्यां’नी या भूखंडावर हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे.

‘मुंबई आणि उपनगरांत म्हाडाकडे फारशा जमिनी शिल्लक नाहीत. त्यामुळे म्हाडाला महसूल विभागाकडून जमिनी हस्तांतरित करून घ्यावी लागतील,’ असे वक्तव्य राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत केले होते; परंतु म्हाडाला आपल्या मालकीच्या भूखंडांचाच विसर पडल्याचे दिसत आहेत. कावेसर येथील ऋतू एन्क्लेव्ह संकुलाजवळील म्हाडाचा सव्‍‌र्हे नं. १७३ या भूखंडावर गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आले आहे. या जागेवर धार्मिक स्थळ बांधण्यात आले आहे. वेळीच या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली नाही, तर कोटय़वधी रुपयांचा भूखंड हातचा जाण्याची भीती परिसरातील दक्ष नागरिक व्यक्त करीत आहेत.

काही महिन्यांपूर्वी येथे बांबू आणि ताडपत्रीच्या साहाय्याने या भूखंडावर एक धार्मिक स्थळ उभारण्यात आले. सुरुवातीला इथे देवी-देवतांची छायाचित्रे ठेवण्यात आली. हळूहळू त्याची व्याप्ती वाढविण्यात आली. या धर्मिक स्थळालगत पुजाऱ्याने राहण्यासाठी निवारा म्हणून ताडपत्रीचे तात्पुरते घरे बांधले आहे. त्यासाठी अनधिकृतपणे वीज आणि पाण्याची जोडणीही केलेली आहे. विशेष म्हणजे या धार्मिक स्थळाशेजारीच म्हाडाचा एक फलक असून अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यावर लिहिलेले आहे. मात्र, त्यानंतरही या भूखंडावर अतिक्रमण कायम आहे.

‘अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही म्हाडाला अनेक वेळा कळविले होते. धार्मिक स्थळांचा वापर करून अनेक ठिकाणी अशा प्रकारे शासकीय जागा लाटण्यात आल्या आहेत. येथे कारवाई केली नाही तर कोटय़वधी रुपयांचा भूखंड गिळंकृत केला जाईल. जर लवकरच कारवाई झाली नाही तर याबाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागू,’ असे सामाजिक कार्यकर्त्यां असलेल्या पर्णिता पोंक्षे यांनी सांगितले.

म्हाडाच्या जागांवरील भूखंडांवर प्रशासन वेळोवेळी तातडीने कारवाई करते. कावेसर येथील अतिक्रमणही हटविण्यात येईल.

विवेक बर्वे, उप अभियंते, म्हाडा.