दीड दशलक्ष पाणी देण्यास मुंबई महापालिकेचा नकार; पाणी रोखण्याचा मीरा-भाईंदर महापालिकेचा इशारा
मीरा रोड येथे म्हाडाच्या वतीने बांधण्यात आलेल्या वसाहतींना पाणीपुरवठा करण्याच्या बदल्यात मीरा-भाईंदर महापालिकेला मान्य केलेले दीड दशलक्ष लिटर पाणी देण्यास मुंबई महापालिकेकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. वारंवार मागणी करूनही मुंबई महापालिका पाणी देत नसल्याने मीरा रोड येथील म्हाडा वसाहतींना होणारा पाणीपुरवठा थांबविण्याचा इशारा मीरा-भाईंदर महापालिकेने दिला आहे.
अल्प उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध व्हावीत यासाठी म्हाडाने विकासकांना अतिरिक्त चटई क्षेत्रफळ दिले. बदल्यात विकासकाने घरे बांधून ती म्हाडाला हस्तांतर केली. अशा रीतीने मीरा रोड परिसरात तयार झालेल्या शेकडो घरांमध्ये सध्या रहिवासी राहायला आले आहेत. परंतु मीरा-भाईंदर महानगरपालिकेने २०११ पासून नवीन नळजोडणी देणे बंद केले असल्याने म्हाडाच्या इमारतींमधून राहायला येणाऱ्या रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. मीरा-भाईंदर महानगरपालिकेने या वसाहतीला पाणी द्यावे, त्या बदल्यात मुंबई महापालिकेकडून दीड दशलक्ष लिटर पाणी देण्यात येईल, असे नक्की करण्यात आले. त्यानुसार मीरा-भाईंदर महापालिकेने या वसाहतींना २०१२मध्ये नळजोडण्या दिल्या. मात्र मुंबई महानगरपालिकेने ठरल्याप्रमाणे पाणी काही दिले नाही. मीरा-भाईंदर महापालिकेने याची वेळोवेळी आठवण करून दिली आहे. मात्र मुंबई महापालिकेकडून त्याची दाद लागू देण्यात आलेली नाही.
आतापर्यंत पाणीकपात लागू असल्याने मीरा-भाईंदर शहरला आधीच कमी पाणी उपलब्ध आसतानाही मुंबई महापालिकेच्या या आडमुठेपणाच्या धोरणाबाबत विशेष लक्ष देण्यात आलेले नाही. मात्र सध्या पाणीकपात सुरू असल्याने मीरा-भाईंदर शहरात पाण्याची परिस्थिती फारच गंभीर बनली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेकडून येणे असलेल्या या पाण्याची आवश्यकता अधिकच जाणवत आहे. मुंबई महानगरपालिकेने असहकार्याचे धोरण असेच सुरू ठेवले तर म्हाडा वसाहतींचा पाणीपुरवठा थांबविण्याची तयारी मीरा-भाईंदर महापालिकेने केली आहे. दुसरीकडे गेल्या साठ वर्षांपासून मुंबई महापालिकेकडून मीरा-भाईंदर होणारा पाणीपुरवठाही पूर्ववत करण्यास टाळाटाळ केली जात आहे.

मुंबई पालिकेचे हात वर
१९६७ मध्ये तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेने मीरा-भाईंदरसाठी मुंबई महानगरपालिकेकडून अडीच दशलक्ष लिटर पाणी मंजूर करवून पाणी योजना सुरू केली. या व्यतिरिक्त काशिमीरा परिसरातील मोठय़ा औद्योगिक कारखान्यांना, तबेल्यांना, एमआयडीसीमधील कारखान्यांनाही मुंबई महानगरपालिका दोन दशलक्ष लिटर पाणी देत होती. सुमारे चार वर्षांपूर्वी महामार्ग रुंदीकरणाच्या कामात ही जलवाहिनी तुटली आणि पाणीपुरवठा खंडित झाला. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली मीरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने नवीन जलवाहिनी अंथरणे, मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीला जोडणी करणे या कामासाठी ८० लाख रुपये खर्च केले आणि गेल्या वर्षी मार्च महिन्यात हे काम पूर्ण केले. त्यानंतर मुंबई महापालिकेकडून पुन्हा अडीच दशलक्ष लिटर पाणीपुरवठा सुरू होणे अपेक्षित होते. मात्र आजपर्यंत हे पाणी मीरा-भाईंदरला मिळालेले नाही. आता तर पाणीकपातीचे कारण पुढे करून मुंबई महापालिकेने हात वर केले आहेत.

म्हाडा वसाहतींच्या बदल्यात मिळणारे पाणी आणि वर्षांनुवर्षांचे हक्काचे पाणी मुंबई महापालिकेकडून मिळाले तर किमान काशिमीरा परिसरात तरी पुरेसे पाणी देणे मीरा-भाईंदर महापालिकेला शक्य होणार आहे. या संदर्भात मुंबई महापालिकेचे जलअभियंत्यांची भेट घेऊन पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. मुंबई महानगरपालिकेने पाणी दिले नाही तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतील.
– रोहिदास पाटील, महापालिकेचे माजी सभागृह नेते