वैतरणाहून ठाणे आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन दुरुस्ती कामावेळी प्रशासनाने पाणी टंचाईकडे दुर्लक्ष करत लाखो लिटर पाणी वाया घालवले. भिवंडी वळपाडा येथे टर्नल बसविण्याचे काम सुरु आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी पाण्याचा दाब कमी करण्यासाठी ठिक ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे व्हॉल सोडण्यात आले होते. त्यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहताना दिसले.

उन्हाच्या झळा वाढू लागल्यानंतर पाण्याचे साठे कमी होवू लागले आहेत. अशा परिस्थितीत वैतरणाहून ठाणे आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे सर्व व्हॉल सोडण्यात आले होते. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया घालवल्याचे चित्र पाहायला मिळाले. वैतरणा ते मुंबई पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे भिवंडी वळपाडा येथे दुरुस्तीचे काम सुरु असताना टर्नल बसविण्यासाठी पाण्याचा दाब कमी व्हावा, यासाठी ठिक-ठिकाणी व्हॉल सोडून पाण्याचा दाब कमी करण्यात आला. पाणी टंचाईचे संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाने फारशी दखल न घेता हा पर्याय अवलंबल्याने नागरिकांना आश्चर्याचा धक्काच बसला. भविष्यात पावसामुळे धरणलोट क्षेत्रात पाण्याची कमतरता भासल्यास प्रशासनाच्या या कामकाज पद्धतीमुळे अडचण निर्माण होऊ शकते, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या.

पाणी टंचाईच्या भीतीमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत असताना बच्चे कंपनीने कारंज्याप्रमाणे उडणाऱ्या पाण्याचा मनमुराद आनंद घेतला.