ठाण्यात पडसाद; राज्यमंत्री नाराजांच्या भेटीला

मुंबई महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहा नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागताच धास्तावलेल्या भाजप नेत्यांनी स्वपक्षातील नगरसेवकांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यातील समेटानंतर अडगळीत पडलेल्या भाजप नगरसेवकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमालीची अस्वस्थता आहे. मुख्यमंत्री अथवा पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी नगरसेवक करू लागले आहेत. एवढे दिवस या कुरबुरींकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजप नेत्यांनी मुंबई महापालिकेतील घडामोडीनंतर सोमवारी रात्री उशिरा ठाण्यातील नाराज नगरसेवकांची बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.

सोमवारी झालेल्या बैठकीत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रत्येक नगरसेवकाशी चर्चा केली आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांनाही बैठकीला बोलावून घेतले. इतके दिवस ढुंकूनही न पाहणाऱ्या नेत्यांना अचानक आपली आठवण झाल्याचे पाहून भाजपचे नाराज नगरसेवक बैठकीनंतर ‘मनसेची कृपा’ अशी प्रतिक्रिया देत होते.

पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यात महापालिका निवडणुकीनंतर महिनाभरातच समेट झाला. या समेटानंतर ठाणे महापालिकेत पालकमंत्री सांगतील तीच पूर्व दिशा असा कारभार सुरू आहे. एरवी आक्रमकतेचा आव आणणारे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल शिवसेना नेत्यांना सोबत घेऊन अनेक वादग्रस्त ठेक्यांची माळ गुंफत असल्याचे भाजप नगरसेवकांचे म्हणणे आहे. ठाणे महापालिकेने नुकतीच १८० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे काढली. या कामांच्या निविदादेखील ठरावीक ठेकेदारांना समोर ठेवून काढण्यात आल्या आहेत, असा आरोप भाजपचे स्थानिक आमदार संजय केळकर यांनी केला आहे.

शिवसेनेपाठोपाठ आक्रमक भूमिकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची कामेही जयस्वाल वेगाने करतात, मात्र भाजप नगरसेवकांच्या प्रभागांत ढुंकूनही पाहात नाहीत, अशा तक्रारी सातत्याने केल्या जात होत्या. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि जयस्वाल यांचीही चांगलीच गट्टी जमली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले अधिकारी म्हणून ठाण्यात दबंग भूमिकेत वावरणारे जयस्वाल भाजप नगरसेवकांना सापत्न वागणूक देत असल्याचे पक्षाच्या बहुतांश नगरसेवकांचे म्हणणे आहे. याविषयी थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने भाजप नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर होता. राज्यात सत्ता असूनही ठाण्यात मात्र अडगळीत पडल्यामुळे काही नगरसेवक उघडपणे नाराजी व्यक्त करत होते. दरम्यान, मुंबई महापालिकेत मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागताच भाजपचे श्रेष्ठी खडबडून जागे झाले आहेत.

याप्रकरणी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. भाजपचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली असे सांगितले.

जयस्वाल यांच्यावर नाराजांची तोफ

’ मुख्यमंत्री फडणवीस आणि आयुक्त जयस्वाल यांच्यात मधुर संबंध असल्यामुळे पक्षश्रेष्ठी दाद देत नसल्याचे म्हणणे या बैठकीत काही नगरसेवकांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मांडले.

* मे महिन्याच्या सर्वसाधारण सभेत काही वादग्रस्त प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर भाजप नगरसेवकांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. पक्षाचे २१ नगरसेवक जयस्वाल यांच्याविरोधात उपोषणाला बसले होते. त्यानंतरही पक्षश्रेष्ठींनी म्हणणे ऐकून घेतले नाही, अशी तक्रार या वेळी नगरसेवकांनी केली.

* भाजप नगरसेवकांच्या प्रभागात गटार, पायवाटांसारखी कामे होत नाहीत आणि मुंब्रा येथील एका नेत्याला खूष करण्यासाठी रस्त्याचा कोटय़वधी रुपयांचा टीडीआर दिला जातो, अशी तक्रारही या बैठकीत काही नगरसेवकांनी केली.

* नगरसेवकांचा नूर पाहून राज्यमंत्री चव्हाण यांनी या बैठकीला आयुक्त जयस्वाल यांना पाचारण केले. बैठकीत भाजप नगरसेवकांच्या प्रभागांतील प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन जयस्वाल यांनी दिल्याचे समजते.