ठाणे स्थानकातील पार्किंग प्लाझाचे भूमिपूजन, दिवा आणि विठ्ठलवाडी स्थानकांतील पुलाचे उद्घाटन असा जंगी कार्यक्रम सोमवारी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत दादर स्थानकात पार पडला. दिवा स्थानकातील पुलामध्ये केवळ दुरुस्तीचे काम करून या पुलाचे उद्घाटन करण्याचा प्रकार रेल्वे प्रशासनाने केल्याने रेल्वे प्रवासी संघटनांकडून टीकेची झोड उठविण्यात आली आहे. दिवा स्थानकात उभारण्यात येणारा पूल पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूंना जोडावा, असे मूळ नकाशामध्ये दर्शविण्यात आले होते. मात्र ते काम अर्धवट उरकून रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनाचा जंगी कार्यक्रम करून प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना दिवा प्रवासी संघटनेने व्यक्त केली आहे.
दिवा स्थानकामध्ये सध्या दोन पूल अस्तित्वात असून त्यापैकी ठाणे बाजूकडील पूल पूर्व आणि पश्चिमेकडे व्यवस्थित जोडलेला आहे, तर दुसरा पूल कल्याण बाजूला असून हा पूल दिवा स्थानकातील चार फलाटांना जोडतो. हा पूल वाढवून पूर्वेकडील बाजूला जोडला जावा, अशी मागणी दिव्यातील प्रवाशांनी केली होती. या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांची संख्या घटू शकणार होती.
तत्कालीन रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांनी या पुलासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे ठरवले होते. तसेच तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी ठाणे महापालिकेच्या हद्दीत हा पूल उतरवण्यासाठी जागा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे दिवा स्थानकातील दुसरा पूलही पूर्णपणे सुरू होऊन प्रवाशांची सोय होईल, अशी अपेक्षा होती. मात्र काम सुरू झाल्यानंतर रेल्वेने केवळ पाचव्या आणि सहाव्या रेल्वे रुळांना अडथळा ठरणाऱ्या भागाची दुरुस्ती करून उर्वरित काम गुंडाळून टाकले. त्यामुळे हा पूल केवळ चार स्थानकांना जोडण्यापुरताच उरला. पूर्वेतील प्रवाशांना याचा काहीच उपयोग होऊ शकणार नसल्याने प्रवाशांचा त्रास कायम राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधांमध्ये कोणताही प्रकारची भर पडणार नसल्याने या पुलाच्या उद्घाटनाचा थाट कशासाठी, असा प्रश्न प्रवासी संघटनांकडून विचारण्यात आला आहे.

ही तर प्रवाशांची थट्टाच
पाचव्या आणि सहाव्या रेल्वे रुळाच्या कामामध्ये दिवा स्थानकातील पूल तांत्रिकदृष्टय़ा अडचणीचा ठरत होता. याकरिता जुन्या पादचारी पुलात तांत्रिक बदल करण्यात आले. या बदलांमुळे प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधेत कोणतीही भर पडलेली नाही. त्यामुळे थातूरमातूर दुरुस्ती कामाला उद्घाटनाच्या बडेजावाची कोणतीही आवश्यकता नव्हती. मात्र रेल्वे प्रशासनाने हा पूल बांधल्यानंतर त्या पुलाचे उद्घाटन करण्यासाठी पूल बंद करून ठेवला होता. खरे तर पूल दुरुस्त करताना पूर्वेकडच्या नागरिकांची सोय रेल्वे प्रशासनाने विचारात घ्यायला हवी होती. मात्र दुरुस्तीनंतरही हा वाद कायम आहे. एखाद्या पुलाचे केवळ किरकोळ दुरुस्तीनंतर उद्घाटन करणे म्हणजे प्रवाशांची थट्टाच आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया ‘दिवा प्रवासी संघटने’चे अ‍ॅड. आदेश भगत यांनी व्यक्त केली.