निमंत्रण पत्रिकेवरून राजकीय पक्षांच्या मानापमान नाटय़ावर प्रशासनाचा तोडगा; सामान्य प्रशासनाच्या मंजुरीनंतर पत्रिकांची छपाई

महापालिकेने हाती घेतलेली विकास कामे पूर्ण झाली की त्याचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन केले जाते. त्यासाठी प्रशासनाकडून रीतसर निमंत्रण पत्रिका छापल्या जातात. परंतु छापलेल्या निमंत्रण पत्रिकाच आता महापालिकेची डोकेदुखी ठरू लागली आहे. निमंत्रण पत्रिकेत कोणत्या नेत्याच्या नावाला अग्रस्थान द्यायचे, कोणाचे नाव वरती, कोणाचे खाली, कोणता नेता अधिक वरिष्ठ यावरून नेतेमंडळीत मानापमान नाटय़ रंगू लागले असून यात प्रशासकीय यंत्रणा भरडली जात आहे. त्यामुळे या विकास कामांची निमंत्रण पत्रिका सामान्य प्रशासन विभागाकडून मंजूर करून घेण्याचे धोरण प्रशासनाने स्वीकारले आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष सत्तेत सहभागी असले तरी भाजप परस्पर विकास कामांचे श्रेय लाटत असल्याचा आरोप शिवसेनेकडून नेहमी केला जातो. तर दुसरीकडे भाजपमधील अंतर्गत गटातटाचे राजकारण असल्यामुळे विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यासाठी काढलेल्या निमंत्रण पत्रिकेत कोणत्या नेत्याला कोणते स्थान द्यायचे यावरून सध्या जोरदार वाद रंगले आहेत. महापालिकेने मोर्वा येथील शाळेच्या आणि क्रीडासंकुलाच्या उद्घाटन पत्रिकेत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण आहे. याशिवाय खासदार, आमदार यांनाही बोलाविण्यात आले आहे. मात्र ऐनवेळी कार्यक्रम  पत्रिकेच्या मसुद्यातील निमंत्रितांच्या नावांमधील ज्येष्ठ-कनिष्ठ असा वाद उफाळून आल्याने प्रशासनाची चांगलीच पंचाईत झाली आहे.

विधानसभेत हक्कभंग

मध्यंतरी महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीने महिला दिनानिमित्त हाती घेतलेल्या कार्यक्रमावरूनही असाच वाद रंगला होता. या कार्यक्रमात राजशिष्टाचाराचे पालन होत नसल्याची तक्रार महापौर गीता जैन यांनी आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांनीही महापालिकेकडून राजशिष्टाचाराची पायमल्ली होत असल्याच्या मुद्दय़ावर विधानसभेच्या अधिवेशनात हक्कभंग दाखल केला होता.

प्रशासनाची शासनदरबारी धाव

प्रशासनाने शासनदरबाराचा आश्रय घेतला आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेचा मसुदा प्रशासनाने थेट शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला. तयार केलेल्या निमंत्रण पत्रिकेत राजशिष्टाचाराचे पालन झाल्याचा शेरा या विभागाकडून प्रशासनाने मिळवला आहे. आता त्याची रीतसर छपाई होऊन निमंत्रण पत्रिकांचे वाटप होणार आहे.