मीरा-भाईंदरची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कोलमडल्याचा महापौरांचा आरोप; पूरस्थितीला यशस्वी तोंड दिल्याचा प्रशासनाचा दावा
शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने रविवारी सकाळी मीरा-भाईंदर शहरातील बहुतांश भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. या वेळी महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असल्याचा आरोप महापौर गीता जैन यांनी केला आहे. मात्र काही ठिकाणचा अपवाद वगळता या परिस्थितीला प्रशासनाने यशस्वीपणे तोंड दिल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे.
शनिवारपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे मीरा-भाईंदरमधील सर्वच भागांत पाणी साठले. रविवारी सकाळी भाईंदर पूर्व येथील बाळाराम पाटील मार्ग, केबिन रस्ता. मीरा रोडचा परिसर, काशिमीरा भागातील मुन्शी कंपाऊंड, लक्ष्मी बाग, वेस्टर्न पार्क, ग्रीन व्हिलेज आदी परिसर पाण्याखाली गेला. अनेक ठिकाणी घरांतून पाणी शिरल्याने रहिवाशांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. या वेळी महापालिकेने स्थापन केलेल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा बोजवारा उडाला असल्याचा आरोप खुद्द महापौर गीता जैन यांनी केला आहे. आपण स्वत: आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क केला असता दूरध्वनी उचलण्यातच आला नसल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. आयुक्तांशीही वारंवार संपर्क केला, मात्र त्यांनीही प्रतिसाद दिला नसल्याचे महापौरांनी सांगितले. सखल भागात तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने शक्तिशाली पंप भाडय़ाने घेतले आहेत; परंतु आपण सांगितल्यानंतरही हे पंप अनेक ठिकाणी पाठविण्यातच आले नसल्याचे महापौर म्हणाल्या. नागरिकांच्या मदतीसाठी स्थापन केलेल्या आपत्कालीन कक्षाकडून नागरिकांना प्रतिसादच मिळत नसेल तर कक्ष स्थापन करून उपयोग काय, असा सवाल महापौरांनी केला आहे.
आयुक्त अच्युत हांगे यांनी मात्र प्रशासनाने या परिस्थितीचा योग्य रीतीने सामना केला असल्याचा दावा केला आहे. जबाबदारी देण्यात आलेले सर्व अधिकारी या वेळी हजर होते. सर्व अधिकाऱ्यांशी आपण स्वत: सातत्याने संपर्क ठेवून परिस्थितीचा आढावा घेत होतो. एखाददुसऱ्या ठिकाणचा अपवाद वगळता पाणी भरलेल्या सर्व ठिकाणी यंत्रणेने चांगले काम केले असल्याचे आयुक्तांनी या वेळी स्पष्ट केले.