छोटय़ा पडद्यावरील मालिकांचे चित्रीकरण करण्यासाठी मीरा-भाईंदर महानगरपालिकेने आपल्या उद्यानांची आणि स्मशानभूमीची कवाडे उघडी केल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उमटली खरी, परंतु यामुळे मीरा-भाईंदर शहरात सुरू असलेली विविध मालिकांची चित्रीकरणे पुन्हा चर्चेत आली आहेत.

भररस्त्यात पोलीस दबा धरून बसले आहेत.. त्यांच्या गाडय़ा वेगाने एखाद्या वाहनाचा पाठलाग करत आहेत.. रस्त्यातच एखादा आणीबाणीचा प्रसंग घडत आहे, तर घाबरून जाण्याचे कारण नाही. हा प्रसंग म्हणजे एखाद्या मालिकेच्या चित्रीकरणाचा एखादा भाग असण्याची शक्यता असू शकते. याचे कारण म्हणजे छोटय़ा पडद्यावरील अनेक गुन्हे मालिकांचे चित्रीकरण करण्यासाठी सध्या मीरा-भाईंदरला सर्वाधिक पसंती मिळत आहे. एवढेच नव्हे तर अनेक कौटुंबिक, धार्मिक मालिकांचे आणि रिअ‍ॅलिटी शोचे चित्रीकरण शहरात उदयास आलेल्या छोटेखानी स्टुडिओंमधून होत आहे.

मुंबईतील अनेक नामवंत चित्रीकरणाचे स्टुडिओ बंद पडले आहेत. या स्टुडिओंचे न परवडणारे भाडे अथवा सतत नावीन्याच्या शोधाच्या हव्यासात असण्याच्या बॉलीवूडच्या सवयीमुळे या स्टुडीओंना शेवटची घरघर लागली. परंतु यामुळे मीरा-भाईंदरमधील अनेक स्टुडिओंना सुगीचे दिवस आले आहेत. अनेक स्टुडिओंमधून मालिकांचे सेट् कायमस्वरूपी लावण्यात आले असून एक किंवा दोन वर्षांसाठी त्याचे आगाऊ बुकिंगही करून ठेवण्यात आली आहेत. बहुतांश स्टुडिओ हे बंद पडलेल्या उद्योगांच्या जागी थाटण्यात आले आहेत. मंदीची लाट आणि करांचे ओझे न पेलवल्याने मीरा-भाईंदरमधील अनेक औद्योगिक कारखाने बंद पडले. औद्यागिक क्षेत्रात असल्याने या ठिकाणी इमारती उभ्या करणे शक्य नाही. म्हणून मालकांना मग या ठिकाणी स्टुडिओ थाटले. स्टुडिओ मालक मालिका निर्मात्यांना मोकळी जागा, वीज, पाणी, वाहनांसाठी पार्किंगची जागा उपलब्ध करून देतात. मग मालिकांचे कलादिग्दर्शक या ठिकाणी आपल्याला हव्या त्या पद्धतीने सेट उभारून घेतात. छोटय़ा पडद्यावरील हिंदी आणि मराठी मालिकांमधील अनेक छोटय़ा-मोठय़ा कलाकारांचा यामुळे शहरात सातत्याने राबता आहे.

चित्रपट अथवा मालिकांचे चित्रीकरण ही बाब मीरा भाईंदरच्या रहिवाशांना नवीन नाही. ७० आणि ८०च्या दशकातही मीरा भाईंदर हे त्या वेळच्या चित्रपट निर्मात्यांचे आकर्षणाचे ठिकाण बनले होते. परंतु त्या काळी शहर आतासारखे अस्ताव्यस्त पसरले नसल्याने फक्त काशिमीरा भागातील घोडबंदरचा किल्ला, जुने विश्रामगृह, वर्सोवा पूल, चेणा नदी तसेच वेलकर ओपन स्टुडिओमध्ये मोठय़ा प्रमाणात चित्रपटांचे चित्रीकरण पार पडले आहे. अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या ‘डॉन’ या चित्रपटातील पेट्रोल पंपावरील अभिनेते इफ्तिकार यांच्या अंगावर पेट्रोल टाकून डॉनचे पळून जाणे, तसेच झीनत अमान यांच्या सोबत पुलावर चित्रित झालेले प्रसंग या ठिकाणचेच. ‘शक्ती’ चित्रपटातील एक प्रसंग घोडबंदर किल्ल्यातील बुरुजावर चित्रित झाला आहे. अनेक चित्रपटांतील जंगलातील पाठलागांची दृश्ये इथल्या वेलकर खुल्या स्टुडिओत चित्रित झाली आहेत. छोटय़ा पडद्यावर गाजलेल्या ‘कृष्णा’ मालिकेचे चित्रीकरणही या ठिकाणीच पार पडले.

महात्मा गांधी यांच्या जीवनावर तयार करण्यात आलेला ‘गांधी’ चित्रपट जगभर गाजला. या चित्रपटातील गांधीजींच्या मिठाचा सत्याग्रह आंदोलनातील काही प्रसंग भाईंदरजवळील मुर्धा गावातील खाडीजवळ चित्रित करण्यात आले. मीरा-भाईंदरमध्ये त्या वेळी मोठय़ा प्रमाणावर मिठाचे उत्पादन घेतले जायचे. आगारात पिकवलेल्या मिठाचे मोठाले ढीगारे या ठिकाणी पाहायला मिळायचे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांनी या ठिकाणालाच पसंती दिली. चित्रपटात दाखविण्यात आलेल्या इंग्रजी अधिकाऱ्यांचे काम करणाऱ्या गोऱ्या कलावंतांना पाहण्याची स्थानिकांमध्ये त्या वेळी एकच अहमहमिका लागायची. मीरा भाईंदरमधील चित्रीकरणाची स्थळे चित्रपटातून पुन:पुन्हा झळकू लागल्याने साहजिकच बॉलीवूडला या स्थळांचा कंटाळा आला आणि त्यांनी मग आपला मोर्चा इतर ठिकाणी वळवला. त्यामुळे लाईट्स, अ‍ॅक्शन, कॅमेरा या दिग्दर्शकाच्या आदेशांनी एकेकाळी गाजलेला वेलकर खुला स्टुडिओ आज सुनासुना झाला आहे. कधी काळी या ठिकाणी चित्रीकरण होत असले तरी पूर्वीची ती रया आता लुप्त झाली आहे.

मधल्या काळात मात्र लुप्त झालेली चित्रीकरणाची ही परंपरा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. काशी मीरा भागातल्या सिने क्लासिक, क्लासिक, अलोरा, ग्रीन व्हॅली, चाफेकर अशा १५ ते २० स्टुडिओमधून अनेक मालिकांचे चित्रीकरण पार पडत आहे. यात प्रामुख्यने हिंदी मालिकांमधील ‘ससुराल सिमर का’, ‘साथीया’, ‘नाखुशी’, ‘पेशवा बाजीराव’ तसेच सध्या प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरलेल्या ‘चल हवा येऊ द्या’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’सारख्या मराठी विनोदी मालिकादेखील या स्टुडिओमधून चित्रित होत आहेत तर ‘अस्मिता’ ही खासगी गुप्तहेरावरील मालिका भाईंदरमध्ये चित्रित झाली. याशिवाय ‘कृष्णदासी’, ‘दिया और बाती हम’, ‘हर हर महादेव’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांचे चित्रीकरणदेखील याच ठिकाणी करण्यात आले. स्टुडिओंसोबतच अनेक खासगी बंगले, फ्लॅट्स चित्रीकरणासाठी उपलब्ध करून दिले जात आहेत.

‘सीआयडी’, ‘क्राईम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ यांसारख्या गुन्हे मालिकांचे बहुतांश चित्रीकरण मीरा भाईंदरमधील मॅक्सस मॉल, सेव्हन इलेवन शाळा, खासगी रहिवासी संकुले, राधा स्वामी सत्संगजवळील रस्ता तसेच इतर सार्वजनिक रस्ते या ठिकाणी पार पडते. या मालिका पडद्यावर रसिकांचे मनोरंजन करत असल्या तरी अनेक वेळा त्यांचे प्रत्यक्ष चित्रीकरण मात्र तापदायक ठरत असते. रस्त्यात पार पडणाऱ्या चित्रीकरणासाठी अनेकवेळा अध्र्याहून अधिक रस्ता अडवला जात असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. चित्रीकरणाच्या काही आणीबाणीच्या प्रसंगाच्यावेळी प्रत्यक्षात चित्रीकरण सुरू असल्याची कल्पना नसल्याने अनेकवेळा नागरिक गोंधळूनही जात असतात.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडून चित्रीकरणासाठी परवानगी दिली जात असली तरी महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांचा आपसात ताळमेळ नसल्याने नागरिक मात्र भरडले जातात. शहरातील उद्याने नागरिकांसाठी बंद करून ती चित्रीकरणासाठी उपलब्ध करून तसेच चक्क  स्मशानभूमीतच चित्रीकरणासाठी परवानगी देऊन अधिकाऱ्यांनी या सर्वावर कडी केली आहे. सार्वजनिक हिताला बाधा येणार नाही अशा पद्धतीने ही चित्रीकरणे पार पाडली जावीत यासाठी महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांनी अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याची अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.