मीरा-भाईंदरमधील विकासकांना केवळ नोटिसा; कारवाई शून्य

डेंग्यूविरोधात उपाययोजना करण्याबाबत मीरा-भाईंदर महानगरपालिका केवळ कागदी घोडे नाचविण्यातच धन्यता मानत आहे. एकीकडे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका जनजागृतीच्या फेऱ्या काढत आहे. दुसरीकडे डासांच्या उत्पत्तीचे मुख्य कारण ठरणाऱ्या विकासकांना मात्र केवळ नोटिसाच बजावण्यात येत असून आजपर्यंत दोषी असलेल्या एकाही विकासकावर कायदेशीर कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूंच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत डेंग्यूने पाच बळी घेतले आहेत, तसेच अनेक रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. केवळ ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत सुमारे ५३० रुग्ण डेंग्यूने बाधित असल्याची माहिती खुद्द प्रशासनाने दिली आहे. डेग्यूवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना केल्याचा दावा केला आहे. डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यातच वाढत असल्याने घरात तसेच परिसरात पाणी साचू देऊ नका, अशा सूचना सर्वाना देण्यात आल्या आहेत. मीरा-भाईंदरमध्ये अनेक ठिकाणी इमारतींचे बांधकाम सुरू आहे. बांधकामांसाठी खोदण्यात आलेल्या खड्डय़ात पाणी साचून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होण्याची शक्यता असल्याने खड्डय़ात पाणी साचू न देण्याच्या नोटिसा पालिकेने शहरातील १३० विकासकांना दिल्या आहेत.

डेंग्यूच्या डासांची पैदास साधारणपणे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात होत असल्याने या आजाराचे रुग्णदेखील या महिन्यात सर्वाधिक असतात. या पाश्र्वभूमीवर पालिकेकडून विकासकांना ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच नोटिसा बजावण्यात आल्या, परंतु बहुतांश विकासकांनी या नोटिसांना केराची टोपली दाखवली आहे. मीरा रोडमध्ये आजही  बांधकाम सुरू असलेल्या अनेक इमारतींच्या आवारात विकासकांनी खड्डे खोदून ठेवले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा पाऊस पडू लागला असल्याने या खड्डय़ांमधून पाणी साचू लागले असून त्यात डासांची पैदास होण्याची भीती येथील रहिवाशांना वाटत आहे. विकासकांना नोटिसा बजावल्यानंतर त्याचे ते पालन करतात की नाही यावर प्रशासनाचे नियंत्रणच राहिलेले नाही. दोषी विकासकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे, परंतु याकडे कानाडोळा केला जात असल्याचा आरोप रहिवासी करू लागले आहेत.

विकासकांवर कारवाई करण्याची मागणी

डेंग्यू डासांच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरणाऱ्या विकासकांवर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. मीरा रोड येथे राहणाऱ्या मंगेश होनमुखे यांच्या घरात तिघा जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. या परिसरातही विकासकाने खड्डे खोदून ठेवले असल्याने त्यात डासांची पैदास होत असल्याचा आरोप होनमुखे यांनी केला आहे. नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या विकासकांवर गुन्हे दाखल केले, तरच उर्वरित विकासक प्रतिबंधात्मक उपाययोजना करतील, असे होनमुखे यांनी सांगितले.

वसईत डेंग्यूने तरुणाचा मृत्यू?

वसई : नालासोपारा येथील महापालिकेच्या तुळींज रुग्णालयात तापाच्या उपचारासाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृत्यू डेंग्यूने झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, त्यानंतर त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजेल, असे पालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

वसई-विरार शहरात सध्या डेंग्यू आणि मलेरियाची साथ पसरलेली आहे. खाजगी आणि पालिकेच्या रुग्णालयात तापाच्या आजाराचे रुग्ण दाखल होत आहे. नालासोपारा येथे राहणारा रमेश यादव (२५) हा तरुण ताप आल्याने तुळींज रुग्णालयात दाखल झाला होता. मंगळवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू डेंग्यूमुळे झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र पालिका रुग्णालयाने त्याला अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. हा रुग्ण तापाच्या उपचारासाठी आला होता. मात्र तो ताप नेमका कशाचा होता, त्याचे निदान झाले नव्हते. त्यामुळे आम्ही त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. त्याचा अहवाला आल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल, असे तुळींज रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. राणी बदलानी यांनी सांगितले.