मीरा-भाईंदर महापालिकेवर तब्बल ६१ जागा जिंकून भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवले. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी या निवडणुकीची गेल्या दोन वर्षांपासून तयारी केली होती. त्याचे फळ म्हणजे हे यश असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या जागा वाढल्या असल्या तरी त्यांना सत्तेची खुर्ची मिळवण्यात अपयश आले. २००७च्या निवडणुकीत ३३ आणि २०१२मध्ये १९ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा केवळ १२ जागांवर समाधान मानावे लागले.

नियोजनबद्ध व्यूहरचनेचे फलित

मतदारांवर आजही कायम असलेली पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू, निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत घातलेले लक्ष, भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी निवडणुकीची गेल्या दोन वर्षांपासून केलेली तयारी याचे फलित म्हणजे भाजपने मिळवलेले हे यश मानता येईल.

मीरा-भाईंदरमध्ये बहुसंख्येने असलेला गुजराती, जैन आणि उत्तर भारतीय समाज यांच्यावर आजही नरेंद्र मोदींचा पगडा कायम आहे. या मतांच्या बळावर सत्ता स्थापन करण्याचे आराखडे भाजपने तयार केले होते. आमदार नरेंद्र मेहता हे गेल्या दोन वर्षांपासून निवडणुकीची तयारी करत होते. मेहता यांनी सर्वात आधी पक्षबांधणीवर लक्ष केंद्रित करून कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. मतदारांची नावे नोंदणी करण्यातही भाजपने आघाडी घेतली होती आणि यात युवा वर्गाचा समावेश मोठय़ा संख्येने होता. हा युवा वर्ग भाजपकडे वळल्याचे स्पष्ट झाले. निडणुकीच्या घोषित झालेल्या प्रभाग रचनेमुळे भाजप चांगलीच अडचणीत आली होती. पक्षाच्या विद्यमान सर्वच नगरसेवकांना कसे सामावून घ्यायचे, असा प्रश्न भाजपपुढे होता. यातून भाजपच्या काही नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला, परंतु त्याचा फारसा परिणाम जाणवून आला नाही, तसेच अनेक नगरसेवकांना त्यांचे मूळचे प्रभाग सोडून इतरत्र सामावून घेतल्याने भाजपला फारसा फटका बसला नाही.

निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपला बहुमत मिळत नसल्याचा गुप्तचर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाला होता. हा अहवाल गांभीर्याने घेत मुख्यमंत्र्यांनी संबंधितांची चांगलीच कानउघाडणी केली. वैयक्तिक वाद बाजूला ठेवून विजयासाठी प्रयत्न करा, असा सज्जड दमच मुख्यमंत्र्यांनी दिला. शिवाय प्रचार संपण्याच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या दोन जाहीर सभाही मोठा परिणाम साधून गेल्या. त्यामुळे सर्व स्तरांवर भाजपकडून करण्यात आलेले निवडणुकीचे योग्य नियोजनच भाजपला सत्तेच्या सोपानापर्यंत घेऊन गेले.

जागा वाढल्या, पण सत्ता नाही

भाजपला कोणत्याही परिस्थितीत सत्तेपर्यंत पोहोचू द्यायचे नाही, अशी जिद्द बाळगूनच शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. सेनेचे ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक हे मीरा-भाईंदरमध्ये तळ ठोकूनच बसले होते. भाजपला आसमान दाखवण्यासाठी सोशल इंजिनीअरिंग आणि इतर डावपेच शिवसेनेकडून खेळण्यात आले. मात्र भाजपला शह देण्यात शिवसेनेला सपशेल अपयश आले. गेल्या वेळेपेक्षा सेनेची ताकद वाढली असल्याचा एकमेव दिलासा सेनेला मिळाला आहे.

भाजपचे नरेंद्र मेहता यांच्याप्रमाणेच सेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे गेल्या वर्षभरापासून निवडणुकीच्या तयारीला लागले होते, परंतु शिवसेनेच्या वाढीला मर्यादा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच त्यांनी विविध डावपेच आखायला सुरुवात केली. सर्वप्रथम भाजपप्रमाणेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून नगरसेवक फोडून पक्षाची ताकद वाढवली.

त्यानंतर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सा यांना पक्षात घेतले. मेन्डोन्सांच्या मदतीने भाईंदर पश्चिम हा भाजपचा बालेकिल्ला फोडण्याची रणनीती आखण्यात आली.

त्यातच भाजपमध्ये उमेदवारी मिळत नसल्याने अनेक नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर होता. त्याचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला, मात्र तो फारसा यशस्वी ठरू शकला नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे केवळ मराठी मतांच्या जोरावर सत्ता गाठणे शक्य नसल्याने शिवसेनेने सोशल इंजिनीअरिंगची कास धरली. मेन्डोन्सा यांच्यामुळे जैन-गुजराती मते आपल्याकडे वळतील ही सेनेची अपेक्षा होती.

त्यात भाजपचे अनेक उत्तर भारतीय नेते शिवसेनेने फोडले. त्यातील अनेकांना उमेदवारीदेखील दिली. जैन आणि ख्रिस्ती उमेदवारही शिवसेनेने उभे केले. परंतु सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग शिवसेनेला सत्तेपर्यंत नेण्यास अयशस्वी ठरला. शिवसेना आपले बालेकिल्लेही राखू शकली नाही, शिवाय गिल्बर्ट मेन्डोन्सा यांची जादू यावेळी मतदारांवर चालली नाही हेच या निकालाने स्पष्ट झाले.

केवळ बालेकिल्ले राखले

निवडणुकीत १२ जागा जिंकून काँग्रेसने आपले परंपरागत बालेकिल्ले राखण्यात यश मिळवले आहे. गेल्या वर्षभरात काँग्रेसचे अनेक नगरसेवक पक्ष सोडून शिवसेना आणि भाजपमध्ये सामील झाले होते. त्यामुळे काँग्रेसची ताकद आधीच कमी झाली होती, मात्र नयानगरमधील प्रभाग जिंकण्यात काँग्रेस यशस्वी ठरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता, तो खरा ठरला.

गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे १९ नगरसेवक जिंकून आले होते, परंतु यातील अनेक जण नंतर पक्ष सोडून गेल्याने पक्षाकडे अवघे दहा ते बारा नगरसेवकच शिल्लक राहिले होते. काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी मीरा रोडच्या शांतीनगर भागात आपले वर्चस्व निर्माण केले होते. २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे तब्बल ३३ नगरसेवक निवडून आले होते, परंतु २०१२ मध्ये ही संख्या घसरून १९ वर आली. त्यातच केंद्रात आलेली नरेंद्र मोदींची लाट, मीरा रोड भागात असलेला बहुसंख्य गुजराती आणि जैन समाज यामुळे काँग्रेसची मीरा रोडवरील पकड सैल होत गेली. भाईंदर पूर्व आणि पश्चिम भागातील अनेक नगरसेवक पक्ष सोडून गेल्याचा फटका काँग्रेसला बसला आहे, मात्र तरीदेखील या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी शांतीनगर भागात चांगली मते घेतली आहेत. नयानगर हा मुस्लीमबहुल परिसर सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या भागात काँग्रेसला प्रतिस्पर्धीच नसल्याने नयानगरच्या तीन प्रभागांत काँग्रेसने एकहाती विजय मिळवले. २२ क्रमांकाच्या प्रभागात त्यांचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. एबी फॉर्म देण्यात झालेल्या गडबडीमुळे काँग्रेसने दोन उमेदवारांना पुरस्कृत केले होते. ते दोनही उमेदवार जिंकून आले. नयानगर भागातील तीन प्रभागांत काँग्रेसचे त्यामुळेच १२ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजप शिवसेनेच्या लढाईत सत्तास्थापनेसाठी काँग्रेसची मदत घ्यावी लागेल, अशी अपेक्षा काँग्रेसला वाटत होती, मात्र शिवसेनेची कामगिरी निराशाजनक झाल्याने काँग्रेसचे सत्तेत यायचे स्वप्न धुळीस मिळाले.


काँग्रेसचे जुबेर इनामदार विक्रमी मताधिक्याने विजयी

भाईंदर  : काँग्रेसचे प्रभाग २२ मधील उमेदवार जुबेर इनामदार हे सर्वाधिक फरकाने विजयी झाले आहेत, तर शिवसेनेचे नवघर येथील प्रभाग ११ मधील उमेदवार अनंत शिर्के अवघ्या नऊ मतांनी विजयी झाले.

जुबेर इनामदार हे मीरा रोडच्या नयानगर भागातल्या प्रभाग २२ मधून निवडणूक लढवत होते. हा प्रभाग काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने जुबेर इनामदार यांचा विजय निश्चित मानला जात होता. जुबेर इनामदार यांना ७,७१५ मते मिळाली तर त्यांच्या समोर निवडणूक लढवणारे शिवसेनेचे मीनाई कुटुवली यांना ३६५ इतकीच मते प्राप्त झाली. त्यामुळे इनामदार ७३५० इतक्या प्रचंड मतांच्या फरकाने विजयी झाले. त्यांच्या पाठोपाठ भाजपच्या विद्यमान महापौर गीता जैन या त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या प्रमिला शहा यांच्याविरुद्ध ६९८८ मतांनी विजयी झाल्या.

शिवसेनेच्या अनंत शिर्के यांना निसटता विजय मिळाला आहे. नवघर गावातील प्रभाग ११ मधून शिर्के हे अपक्ष उमेदवार सचिन डोंगरे यांच्यापेक्षा अवघी नऊ मते अधिक मिळवून विजयी झाले. डोंगरे हे शेवटच्या क्षणापर्यंत आघाडी टिकवून होते त्यामुळे शिवसेनेचे शिर्के बालेकिल्ल्यात पराभूत होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु अखेरच्या फेरीत शिर्के यांनी नऊ मते अधिक घेत विजय मिळवला.