मालमत्ता कराची विक्रमी वसुली; बडय़ा थकबाकीदारांवर प्रशासनाचे लक्ष

महापालिकेकडे कर भरण्यासाठी ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा चालतील, असे शासनाकडून सांगण्यात आल्यानंतर मीरा-भाईंदर महापालिकेने मालमत्ता कराची विक्रमी वसुली केली. या करासोबतच आता वर्षांनुवर्षे कर न भरणाऱ्या बडय़ा थकबाकीदारांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले असून या संधीचा फायदा घेत थकबाकीचीदेखील वसुली करण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे.

चलनातून बाद झाल्यानंतरही शासकीय कर भरण्यासाठी या नोटा वापरण्याची परवानगी शासनाकडून देण्यात आल्याने महापालिकेचे विविध कर भरण्यासाठी या संधीचा फायदा घेण्यात आला. विविध मार्गाचा उपयोग करून करदात्या नागरिकांना कर भरण्यासाठी प्रशासनाने उद्युक्त केले. बँकेबाहेर पैशांसाठी लागत असलेल्या नागरिकांच्या रांगांचादेखील महापालिकेने उपयोग करून घेतला आहे. बँकेबाहेर रांगेत उभे असलेल्या नागरिकांची महापालिका कर्मचारी भेट घेऊन त्यांना जुन्या नोटांचा वापर महापालिकेचा कर भरण्यासाठी करण्याचे आवाहन करत आहेत. त्याचादेखील फायदा होऊन सोमवारी दुपापर्यंत तब्बल १२ कोटी रुपयांची करवसुली करण्यात आली. एकीकडे मालमत्ताकराची चालू वर्षांची वसुली करण्यात येत असतानाच आता थकबाकीदारांकडेही प्रशासनाने मोर्चा वळवला आहे. वर्षांनुवर्षे मालमत्ताकराचा भरणा न करणाऱ्यांच्या दारी आता महापालिकेचे कर्मचारी जाऊन धडकत आहेत. जुन्या नोटांच्या मदतीने थकबाकी भरण्याचे आवाहन कर्मचारी करत आहेत.

कामचुकार कर्मचाऱ्यांना नोटीस

गेल्या शुक्रवारपासून महापालिकेचे विविध विभागातील कर्मचारी करवसुलीसाठी तब्बल बारा तास काम करत आहेत. सोमवारी सुट्टी असतानाही तब्बल १५०० अधिकारी व कर्मचारी कामावर हजर होते. असे असताना महापालिकेच्या कर विभागातील बारा लिपीक गेल्या काही दिवसांपासून कामावर गैरहजर राहिले आहेत. अशा कर्मचाऱ्यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस जारी केली असून समाधानकारक खुलासा न केल्यास त्यांच्यावर पुढील कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

  • थकबाकीची वसुलीदेखील जास्तीत जास्त व्हावी यासाठी एक लाखांवर थकबाकी असणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
  • महापालिकेचे वर्ग ‘एक’ व वर्ग ‘दोन’चे अधिकारी व विभागप्रमुख यांच्यावर थकबाकी वसुलीची जबाबदारी देण्यात आली आहे.
  • महापालिकेच्या सहा प्रभागात हे अधिकारी इतर कर्मचाऱ्यांच्या समवेत थकबाकीदारांच्या दाराशी जाऊन त्यांच्याकडून थकबाकीची वसुली करत आहेत.

जुन्या नोटा वापरण्याची मुदत २४ तारखेपर्यंत वाढविण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी तसे अधिकृत आदेश अद्याप महापालिकेकडे आलेले नाहीत. त्यामुळे सध्यातरी सोमवार रात्री बारापर्यंत जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार असून महापालिकेला मिळालेल्या संधीचा लाभ घेत थकबाकीसह मालमत्ताकराच्या एकंदर मागणीच्या १० टक्के म्हणजेच सुमारे १५ कोटी रुपयांची वसुली करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. – डॉ. नरेशी गीते, आयुक्त, मीरा-भाईंदर महापालिका.

थकबाकीदाराची नळजोडणी विखंडित

वारंवार नोटिसा देऊन गेल्या अनेक वर्षांपासून कराचा भरणा न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा महापालिकेने उचलला आहे. भाईंदर पश्चिम येथील रॉयल रेसीडेन्सी या इमारतीची तब्बल १६ लाख रुपयांची मालमत्ताकराची थकबाकी आहे. या इमारतीची नळजोडणी पालिकेने खंडित केली. अशा बडय़ा थकबाकीदारांवरील कारवाई सुरूच ठेवण्यात येणार आहे.