निवडणुकीच्या तोंडावर ठाण्याकडे मोर्चा

काही महिन्यांपासून दिवा परिसरावर लक्ष केंद्रित करणाऱ्या मनसेच्या नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा ठाण्याकडे मोर्चा वळविला आहे. मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या १७ उमेदवारांनी निवडणूक कार्यालये थाटली असून यानिमित्त शुक्रवारी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचा ठाण्यात दौरा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यालय शुभारंभ सोहळ्यात पक्षाकडून चारचाकी आणि दुचाकी वाहनांची प्रचारफेरी काढली जाणार आहे. निवडणूकपूर्व शक्तिप्रदर्शनाचा हा प्रयत्न असेल.

ठाणे महापालिका निवडणूक चार प्रभागांचे एक पॅनल या पद्धतीने होणार असून या निवडणुकीसाठी दोन महिन्यांपूर्वी नवीन प्रभाग रचना जाहीर करण्यात आले. या रचनेनुसार दिवा परिसरातील तीन पॅनलमधून तब्बल ११ नगरसेवक निवडून येणार असल्याने राजकीयदृष्टय़ा या भागाचे महत्त्व वाढले आहे. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत दिवा परिसरात नगरसेवक पदासाठी दोनच जागा होत्या आणि त्या जागांवर मनसेचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र, या दोन्ही नगरसेवक काही महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या गोटात दाखल झाले. त्यातच नव्या प्रभाग रचनेत दिवा परिसरात नगरसेवक पदाच्या ११ जागा जाहीर झाल्याने शिवसेना, भाजप आणि मनसेने दिवा परिसरावर लक्ष केंद्रित केले आहे.

दिव्याचा गड राखण्यासाठी मनसेकडून काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू झाले असून त्यासाठी मनसेचे शहरातील पदाधिकारी दिव्यात ठाण मांडून बसलेले आहेत. आधीच शहरात मनसेचे फारसे अस्तित्व नसताना नेत्यांच्या दिवा मुक्कामामुळे निवडणुकीच्या तोंडावर शहरात मनसे फारशी चर्चेत नाही.

आज सायंकाळी राज यांची सभा

असे असतानाच निवडणुकीच्या तोंडावर आता मनसेच्या नेत्यांनी पुन्हा ठाणे शहराकडे मोर्चा वळविला असून शहरात वातावरणनिर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या संदर्भात मनसेचे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या १७ उमेदवारांच्या निवडणूक कार्यालयांच्या उद्घाटनांसाठी मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे हे शुक्रवारी सायंकाळी ठाण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले. वागळे इस्टेट, कोपरी, पाचपाखाडी, कळवा, वृंदावन, राबोडी, खारटन रोड या भागांत ही कार्यालये सुरू करण्यात येणार आहे.