‘मनसे’तर्फे आज ठाणे शहरातील माजीवडा नाक्याजवळील खड्ड्यांमध्ये हवा भरलेले पेंग्विन सोडून ‘बालहट्टाचे पेंग्विन’ हे आंदोलन करण्यात आले. ठाण्यातील रस्त्यांना अनेक ठिकाणी खड्डे पडले असून महत्त्वाच्या रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यांवरील खड्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले असून त्याला सत्ताधारी आणि भ्रष्ट प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही मनसेने केला आहे. पालिका आणि राज्यातील सत्ताधारी शिवसेना हे युवराज आदित्य ठाकरे यांचे बालहट्ट पुरवण्यासाठी पेंग्विंनवर करोडो रूपये खर्च करत असताना स्थानिक समस्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला.
पेंग्विनना उणे तापमानात ठेवावे लागते. मुंबईतील उष्ण तापमानात पेंग्विन फार काळ तग धरू शकणार नाहीत, असा तज्ञ्जांचा अंदाज असतानाही त्यांच्यावर जवळपास १४ ते १५ कोटी खर्च होतो आहे. परंतु, हेच पैसे ठाणे आणि मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी खर्च करणे आवश्यक होते. तसे न करता जनतेचा पैसा अनावश्यक ठिकाणी खर्च केला जात आहे. ठाण्यातील वृंदावन नाका, घोडबंदर रोड, तीन हात नाका यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा होऊन आठ ते दहा फुटांचे खड्डे पडले असून नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. मात्र, पालिका प्रशासनाचे त्याकडे लक्ष नाही. पालिका प्रशासन आणि सत्ताधा-यांकडून रस्ते बांधणीत हात सफाई होत असल्याचा आरोप करत ठाणे मनसेने या विरोधात आंदोलन करत रस्ते घोटाळ्याचा निषेध केला.