पाहताक्षणी आबालवृद्धांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या माकडांनी सध्या ठाणेकरांवर मात्र  रडायची वेळ आणली आहे. ठाणे तसेच कल्याण शहराच्या हद्दीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासहित अन्य वनक्षेत्रात अधिवास असलेल्या माकडांनी आता थेट शहरातील वसाहतींमध्येच ठाण मांडले आहे. खाद्याच्या शोधात ठाण्यातील लोकवस्तीत बस्तान मांडणाऱ्या माकडांच्या टोळीने ठाण्यातील नौपाडा तसेच कल्याणमधील खडकपाडा परिसरातील घरात शिरून नासधूस सुरू केल्याने नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत तक्रारी करूनदेखील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काहीही कारवाई न केल्याने नागरिकांत तीव्र नाराजी आहे.
ठाण्यातील समतानगर, घोडबंदर परिसरातील वनराईमुळे त्या ठिकाणी पूर्वी माकडांचा वावर होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जंगलापासून दूर असलेल्या नौपाडय़ातील भास्कर कॉलनी आणि ब्राह्मण सोसायटी या भागातही मर्कटलीला सुरू झाल्याने रहिवासी धास्तावले आहेत. कल्याण शहरातील खडकपाडा परिसरातील गृहसंकुलांमध्ये माकडांचा उच्छाद वाढला आहे.
ठाण्यातील समतानगर परिसरातील ड्रग्ज एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील उघडय़ा खिडकीच्या घरांमध्ये रविवारी तीन माकडे शिरली आणि त्यांनी अख्खे संकुल डोक्यावर घेतले. घरांतील वस्तूंची नासधूस केल्यानंतर या टोळीने शेजारील साई आनंद इमारतीतील घरात शिरून तेथील लॅपटॉपचा माऊस पळवला. सुमारे सहा तास ही माकडे परिसरात धुमाकूळ घालत होती. येथील रहिवाशांनी वन विभागाच्या नियंत्रण कक्षाशी तसेच वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठूनही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही, तर अग्निशमन दलाच्या जवानांनी ‘हा वन विभागाचा प्रश्न आहे’ असे सांगून मदत करण्यास नकार दिला. अखेर फटाके वाजवून नागरिकांनीच माकडांना पळवून लावले, अशी माहिती विश्वनाथ सालिया यांनी दिली.
दरम्यान, वन विभागाच्या येऊर विभागात नव्याने नियुक्त झालेले विभागीय वन अधिकारी संजय वाघमोडे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनसुद्धा त्यांचा फोन बंद होता. तर उपवन संरक्षक किशोर ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी उत्तर दिले नाही.

खाद्याच्या शोधात शहरात
ठाण्यातील येऊर आणि मामा-भाचा डोंगरातील झाडांवर वास्तव्यास असलेल्या माकडांनी खाद्याच्या शोधात शहरात स्थलांतर केले आहे. येथील ब्रह्मांड, शिवाईनगर, लोकमान्यनगर, यशोधननगर, विजयनगर, ज्ञानेश्वरनगर या परिसरामध्ये माकडांचा उपद्रव वाढत चालला आहे. जंगलापेक्षा अत्यंत सोप्या पद्धतीने खाद्य उपलब्ध होत असल्याने माकडांचा वावर वाढला आहे, असे प्राणीप्रेमींचे म्हणणे आहे. या माकडांनी अद्याप कोणावरही हल्ला केला नसला, तरी पिशवी घेऊन जाणाऱ्या व्यक्तीकडे खाण्याचे पदार्थ असल्याची भावना त्यांच्यात असल्याने अशा व्यक्तींवर ते हल्ला करू शकतात. तसेच त्यांच्यावर हल्ला केल्यास ती हिंसक बनतील, अशी शक्यता ‘अ‍ॅनिमल हेल्थ केअर’चे प्राणीमित्र पराग शिंदे यांनी व्यक्त केली.