ते दहावी उत्तीर्ण झाले, तेव्हा त्यांच्यापैकी क्वचित एखाद-दुसऱ्याकडे लॅण्डलाइन दूरध्वनी होता. त्यामुळे १९८७ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यावर निरनिराळ्या वाटेने जगाला सामोरे गेल्यानंतर प्रत्येकाचा एकमेकांशी असलेला संपर्क कमी होत गेला. मात्र उच्च शिक्षण, नोकरी- व्यवसाय आणि संसाराच्या रहाट गाडग्यात गुंतून गेलेले असतानाही प्रत्येकाच्या मनात कुठेतरी शाळा आणि त्यावेळचे सोबती घर करून होते. तब्बल २७ वर्षांनंतर गेल्या वर्षी त्यापैकी काहींनी पुढाकार घेऊन आपल्या शाळू सोबत्यांना हुडकून एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. ई-मेल, फेसबुक, व्हॉटअपस् या आधुनिक संपर्क माध्यमांचा त्यासाठी बराच उपयोग झाला आणि बघता बघता त्यावेळच्या हजेरीपटावरील चाळीसहून अधिक मुले-मुली संपर्कात आले.
गेल्या वर्षी शाळेतच अनौपचारिक स्नेह संमेलन भरविल्यानंतर यंदा गेल्या रविवारी या शाळू सोबत्यांनी बदलापूरजवळील बेंडशीळ येथील राजू भट यांच्या शेतावर चक्क वर्षांसहल आयोजित केली. मुंबई, पुणे, नाशिक आदी परिसरात स्थायिक असलेले या बॅचचे शाळू सोबतीही या सहलीत सहभागी झाले होते. तेथील निसर्गरम्य परिसरात रंगलेल्या गप्पांच्या मैफलीतून शाळेच्या दिवसातील आठवणींना उजाळा दिला गेला. मधल्या अठ्ठावीस वर्षांच्या काळात बऱ्याच गोष्टी बदलल्या. अगदी शाळेचे नावही बदलले. कानसई हायस्कूल या शाळेचे आता भाऊसाहेब परांजपे विद्यालय असे नामकरण झाले आहे. ‘आठवणीतल्या आठवणी’ असेच या वर्षां सहलीचे सूत्र होते. हास्यविनोद, चर्चा, एकमेकांच्या शाळेनंतरच्या काळातील घडामोडी ऐकण्यात दिवस कसा निघून गेला तेच समजले नाही. तब्बल ३२ शाळूसोबती या वर्षां सहलीत सहभागी झाले होते. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या एका शाळूसोबत्याने यानिमित्ताने केलेली कविता वाचून दाखविण्यात आली. न्यूझीलंडमध्ये वास्तव्यास असलेल्या एका मैत्रिणीसाठी लगेच समूह छायाचित्रे पाठविण्यात आली.

संकल्प शाळू सोबत्यांचे!
शाळेच्या बाकावरून पुढे प्रत्येकाच्या वाटा वेगवेगळ्या होत असल्या तरी प्रत्येकाच्या मनाच्या सांदी कोपऱ्यात कुठेतरी शाळेच्या आठवणी दडलेल्या असतात. गेल्या दहा-बारा वर्षांत सोशल मिडीयामुळे असे अनेक शाळूसोबत्यांचे समूह एकत्र येऊ लागले आहेत. फेसबुक किंवा व्हॉटस्अपच्या माध्यमातून ते एकमेकांशी संपर्क साधू लागले आहेत. सध्या बहुतेक शाळांमध्ये वेगवेगळ्या वर्षांतील माजी विद्यार्थी संघ कार्यरत आहेत. काही माजी विद्यार्थी संघ शाळेला, शाळेतील विद्यार्थ्यांना मदतही करतात. गेली काही वर्षे ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार सर्वत्र फ्रेंडशिप डे म्हणून साजरा होत असला तरी वर्षभर मैत्रीचे हे सुखद सोहळे कुठे न् कुठे सुरूच असतात. ठाणे परिसरातील माजी विद्यार्थी संघांचे संकल्प, त्यांचे उपक्रम जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. ठाणे परिसरातील माजी विद्यार्थी संघांनी आपापल्या समूहाची माहिती newsthane@gmail.com या
ई-मेल पत्त्यावर किंवा ‘लोकसत्ता ठाणे’, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प) येथे पाठवा. दूरध्वनी २५३८५१३१.