ठाणे जिल्हा प्रशासनाचा अहवाल आणि मुंबईचे काय? कारवाईबाबत प्रश्नचिन्ह

परवानगी न घेता उत्सव मंडप उभारणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांवर दंडात्मक कारवाई करण्यावरून महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्यात टोलवाटोलवी सुरू असतानाच सध्या सुरू असलेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सवातही मोठय़ा प्रमाणात विनापरवानगी मंडप उभारण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर आणि उल्हासनगर या सहा महापालिका परिसरांमध्ये ३०३ सार्वजनिक नवरात्रोत्सवांपैकी तब्बल २२० मंडळांनी स्थानिक प्राधिकरणांकडून परवानगी न घेता मंडप उभारले आहेत. मुंबईतील मंडळांची अशा प्रकारची माहिती उपलब्ध नसल्याने कारवाई कशी आणि कोणावर करणार, याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरे करताना आखून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन न करणाऱ्या मंडळांवर दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेने यंदा परवानगी न घेता मंडप उभारणाऱ्या शहरातील ५४ मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल केले. या बडग्याने शहाणे होऊन किमान नवरात्रोत्सवात तरी परवानगी घेऊन मंडप उभारणी होईल, ही अपेक्षा मात्र सपशेल फोल ठरली आहे. दंडात्मक कारवाई कुणी आणि कशी करायची, यावरून महापालिका आणि जिल्हा प्रशासनांमध्ये खल सुरू असतानाच नवरात्रोत्सवातही मोठय़ा प्रमाणात विनापरवाना मंडप उभारणी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या मंडपांचे सर्वेक्षण करून तो अहवाल संबंधित स्थानिक प्राधिकरणांना देणे एवढेच जिल्हा प्रशासनाचे काम असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार प्रत्येक महापालिका क्षेत्रासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली पथक नेमले आहे. या पथकाने परवानगी न घेता उभारणी केलेल्या मंडपांचा तपशील संबंधित महापालिकांना पाठविला आहे. आता त्यावर पालिका प्रशासन काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मुंबईतही शेकडो सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळे आहेत. मात्र त्यापैकी किती मंडळांनी मंडप उभारताना परवानगी घेतली याचा तपशील उपलब्ध नाही. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशांनुसार विनापरवाना उभारलेल्या मंडपांवर काय कारवाई होणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

अनधिकृत मंडप

’ठाणे महापालिका क्षेत्रात ६७ पैकी ६१ मंडप अनधिकृत आहेत. कल्याण-डोंबिवलीतील ५३ पैकी ३९ तर नवी मुंबईतील ९५ पैकी ४४ मंडप परवानगीशिवाय उभारण्यात आले आहेत.

’उल्हासनगरमधील २० पैकी ९ मांडवांना परवानगी नाही. विशेष म्हणजे मीरा-भाईंदर आणि भिवंडी-निजामपूर महापालिका क्षेत्रात एकही मंडप परवानगी घेऊन उभारण्यात आलेला नाही.

’मीरा-भाईंदरमध्ये ३६ तर भिवंडी-निजामपूरमध्ये १७ ठिकाणी अनधिकृत मंडप आहेत.