सर्वाच्या आधी आपणच बातमी द्यायची या स्पर्धेने पछाडलेल्या खासगी वृत्तवाहिन्यांनी निवडणूक निकाल आणि कल यातील फरकही लक्षात न घेता ‘चालविलेल्या’ बातम्यांमुळे सोमवारी असंख्य प्रेक्षकांची फसवणूक झाली आणि जाणत्यांचे मनोरंजन. दुपापर्यंत खरे आणि अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर वाहिन्यांनी केलेल्या या ‘कल’कलाटाबद्दल अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली.
सकाळपासूनच निवडणूक निकालाचे मॅरेथॉन वृत्तांकन करण्यासाठी बसलेल्या वाहिन्यांकडे दुपापर्यंत मतदानाच्या कलाशिवाय फारशा काही बातम्या नव्हत्या. त्यामुळे या कलांनाच निकाल मानून त्यावर चर्चा घडवून आणण्यात येत होती. साधारण दुपारी बाराच्या सुमारास तर बहुसंख्य वाहिन्यांनी शिवसेनेने कल्याण-डोंबिवली जिंकले अशी बातमी दिली. ते कल होते हे लक्षात न घेता त्यावर काही नेत्यांच्या प्रतिक्रियाही घेतल्या. इतकेच काय, एमआयएमने मोठी मुसंडी मारत तीन ते चार जागा जिंकल्या, हे दाखवून त्यांच्या नेत्यांच्याही प्रतिक्रिया घेतल्या. मात्र दुपारनंतर अंतिम निकाल पाहिला तर शिवसेना-भाजपमध्ये १० जागांचे अंतर राहिले. साधे बहुमत कुणालाही मिळाले नाही. मात्र आपल्याकडे पहिल्यांदा निकाल दिसला पाहिजे या अहमहमिकेपायी प्रेक्षकांची मात्र दिशाभूल झाली.
एका वाहिनीने जास्त जागा दाखवल्यावर मग आपण मागे पडलो काय असे वाटून जागा वाढवल्या नाहीत ना, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला. मतमोजणी सुरू झाल्यावर शिवसेना खूपच पुढे होती. नंतर थोडे हे अंतर कमी झाले. मात्र पुन्हा शिवसेनेने ६० च्या पुढे जागा जिंकत बहुमत मिळाल्याचे दाखवण्यात आले. त्या वेळी भाजपच्या साधारणत: ३० जागा दाखवण्यात येत होत्या. त्याच आधारावर तासभर विश्लेषणही झाले. मात्र नंतर अंतिम निकाल पाहता वाहिन्यांनीच चित्र बदलले, असे दाखवून प्रेक्षकांचीच दिशाभूल करण्याचा प्रकार केला.
वाढती मतदारसंख्या, त्यातून मतमोजणीच्या फेऱ्या हे गणित लक्षात न घेताच निकालावर शिक्कामोर्तब करण्यात आले, यातून प्रेक्षकांना मात्र यातील फोलपणा निकालानंतर लक्षात आला.