उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेसह तिच्या बाळाचाही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आरती चौहान असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकारानंतर मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयातच मृतदेह ठेवून डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत कारवाई करण्याची मागणी लावून धरली. अखेर रुग्णालय प्रशासनाने तडकाफडकी एका डॉक्टरला निलंबित केले असून अन्य एका डॉक्टरची चौकशी करण्यात येणार आहे.

आंबिवली येथे राहणाऱ्या आरती चौहान यांना शुक्रवारी प्रसूतिवेदना होऊ  लागल्याने पती होरीलाल चौहान यांनी त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणले. मात्र येथील डॉक्टरांनी सुरुवातीला उपचार न करता कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. तब्बल चार तासांनी त्यांच्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. मात्र शस्त्रक्रियेनंतर बाळाचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांना सांगण्यात आले. यानंतर काही वेळातच आरतीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केल्याचे होरीलाल चौहान यांनी सांगितले. या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी संताप व्यक्त केल्यानंतर  आरती यांचा मृतदेह मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला होता. शवविच्छेदन झाल्यानंतर शनिवारी सकाळी जेजे रुग्णालयातून मृत्यदेह घेऊन चौहान कुटुंबीयांनी पुन्हा मध्यवर्ती रुग्णालय गाठले आणि मृतदेह रस्त्यावर ठेवून ठिय्या आंदोलन सुरू केले. दोषी डॉक्टरांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतल्याने मध्यवर्ती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी तातडीने निर्णय घेत डॉ. सुहास कदम यांना निलंबित केले, तर डॉ. अर्चना आखाडे यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.