तिसऱ्या दिवशीही प्रवाशांचे हाल सुरूच

गेल्या तीन दिवसांपासून खोपट एसटी आगारात राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. सकाळी उठायचे, बस आगारात यायचे आणि संपाकऱ्यांशी पुढे होणाऱ्या घडामोंडीविषयी चर्चा करायची असाच त्यांचा सध्याचा दिनक्रम आहे.

ठाण्यातील खोपट येथील आगारात संपकरी गेल्या तीन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. अनेक संपकरी हे उरण, मुंबई, पालघर या भागांतील आहेत. त्यामुळे त्यांच्या नाश्ता आणि जेवणाची सोयही येथेच करण्यात येते. अनेकांच्या हाती वृत्तपत्रे दिसतात.

गेल्या दोन दिवसांपासून आलेल्या एसटीच्या विविध बातम्यांविषयी चर्चा करताना के दिसत आहेत. सुमारे एक हजार कर्मचारी या संपाच्या ठिकाणी दररोज भर उन्हात इथून तिथे चकरा मारताना दिसतात. दुपारच्या सत्रात काही कर्मचारी एसटीच्या लाल डब्यात झोपून पुन्हा एकदा संपासाठी तयार होतात.

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडून आशा होती. मात्र, त्यांना एसटी कर्मचाऱ्यांसाठी काहीच चर्चा केली नाही, त्यामुळे हजारो एसटी कर्मचाऱ्यांचा त्यांना शाप लागेल, अशा भावना कर्मचारी व्यक्त करत आहेत. एस. टी. कर्मचारी बेमुदत संपावर गेले असूनही आणि राज्यातील वाहतुकीचे मुख्य साधन ठप्प झाले

असतानाही, सरकारला निर्णय घेता येत नाही. एस.टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग जोपर्यंत लागू होत नाही, तोपर्यंत आपण दाढी काढणार नाही असा निर्धार भिवंडी आगारातील एसटीचे कर्मचारी सोमवते यांनी व्यक्त केला.

दिवाळीत आमच्या पदरी काही तरी पडेल असे वाटत होते. मात्र, तसे झाले नाही. असे महाराष्ट्र मोटर वाहतूक फेडरेशनचे माजी अध्यक्ष किसनराव सैद यांनी सांगितले.

खासगी बसगाडय़ांना परवानगी

संप सुरू असताना बुधवारी जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या बैठकी झाल्या. यात ठाणे विभागातील आठ आगारांमध्ये खासगी तसेच पालिकेच्या बसना आगारातून प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली. तसेच या आठ आगारांत संपर्क अधिकारी म्हणून पोलीस, प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी, एसटी महामंडळातील अधिकारी यांची वाहतूक नियंत्रण ठेवण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.