नगरसेविकेच्या मुलासह तिघे जखमी

महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर शहरात त्याचे राजकीय पडसादही उमटू लागले असून एका चकमकीत भाजप नगरसेविकेच्या मुलासह तीनजण जखमी झाले आहेत.

शुक्रवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी दोन गटांनी एकमेकांविरोधात केलेल्या तक्रारीवरून २७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोलमैदान परिसरातील साधू वासवाणी पुतळ्यासमोर शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास गुरुदीप ऊर्फ बॉक्सर लभाना हा सुरेंद्रसिंग लभाना याच्यासोबत अ‍ॅक्टिव्हा मोटरसायकलवरून घरी जात होता. त्या वेळी मोटरसायकलवरून आलेल्या २० ते २१ जणांच्या टोळीने त्याला अडवले. अज्जू नावाच्या तरुणाने त्याच्याजवळील रिवॉल्व्हर काढून गुरुदीप याच्या पोटाला लावून त्याच्याकडील १० हजारांची रोख रक्कम व गळ्यातील सोन्याची साखळी काढून घेतली. त्यानंतर त्यांनी चॉपर, तलवार, गुप्ती व चाकूने गुरुदीप ऊर्फ बॉक्सर याला मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यात तो जखमी झाला. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक अहिरे करीत आहेत.