‘‘विद्यार्थीदशेत असताना चुका करणे हा त्या वयातला अल्लडपणा असतो. पण त्या चुकांमधून शिकून भविष्यात नम्रतेने वागणे हे महत्त्वाचे असते. संधी तुमच्याकडे चालून येत नाही तर विद्यार्थी असताना अशा संधी तुम्हाला शोधाव्या लागतात,’’ असे मत मुंबई विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केले. ‘विद्या प्रसारक मंडळा’च्या बांदोडकर महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ‘गुणगौरव’ समारंभात ते बोलत होते.
बांदोडकर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले डॉ. देशमुख यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या व्यवस्थापनातर्फे त्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी स्वागतासाठी महाविद्यालयाचे अभिमान गीत या प्रसंगी सादर केले. बांदोडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या माधुरी पेजावर यांनी प्रास्ताविकात विद्यार्थी दशेतल्या डॉ. संजय देशमुख यांच्या आठवणी सांगितल्या. बांदोडकर महाविद्यालयात विद्यार्थी असताना तासन्तास केलेला अभ्यास, पाच विषयांमध्ये मिळवलेली डॉक्टरेट पदवी, विद्यापीठात वेगवेगळ्या विभागांत काम केल्याचा अनुभव आणि अथक परिश्रम आणि सोबत नम्र वृत्ती हेच डॉ. संजय देशमुख मुंबई विद्यपीठाचे कुलगुरू होण्याचे रहस्य आहे, असे प्रा. पेजावर यांनी सांगितले.
बांदोडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुलाखतीच्या स्वरूपात डॉ. संजय देशमुख यांचा विद्यार्थी ते पीएच.डीपर्यंतचा प्रवास उलगडला.  कोणत्याही शाखेत शिकत असताना किमान त्या शाखेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करायला हवे. येत्या पाच वर्षांच्या काळात चार कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. ज्यामध्ये या शिक्षणाचा उपयोग होऊ  शकतो. प्रत्येक विद्यार्थ्यांने सामाजिक बांधिलकी जपावी आणि पर्यावरण हा आपल्या जगण्याचा मंत्र असावा, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.