किलोमीटरमागे आता १५ रुपये भाडेवाढ; रुग्णांची परवड

सर्वसामान्य रुग्णांना सवलतीच्या दरात देण्यात येणाऱ्या मीरा-भाईंदर महापालिकेच्या रुग्णवाहिकेच्या दरात तब्बल चारपटीने वाढ करण्यात आली आहे. पूर्वी किलोमीटरमागे चार रुपये घेण्यात येत होते, आता किलोमीटरमागे १५ रुपये रुग्णाच्या कुटुंबीयांना मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, खासगी रुग्णवाहिकाही किलोमीटरमागे ११ रुपये घेतात. त्यामुळे खासगी रुग्णवाहिकीचे दरही महापालिका रुग्णावहिकेच्या दरांपेक्षा कमी असल्याने महापालिकेच्या या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मीरा-भाईंदर शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी महानगरपालिकेने सवलतीच्या दरात रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग कार्यालयांतर्गत एक याप्रमाणे सहा रुग्णवाहिका कार्यरत आहे आणि त्यांना मागणीही मोठय़ा प्रमाणावर आहे. या सेवेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांकडून चार रुपये प्रति किलोमीटर या दराप्रमाणे रुग्णवाहिकेचे शुल्क घेण्यात येत होते, परंतु गेल्या काही महिन्यांपासून या दरात सुमारे चारपट वाढ करण्यात आली आहे. हे दर आता १५ रुपये प्रति किलोमीटर इतके वाढविण्यात आले आहेत. या दरात अचानकपणे एवढी वाढ करण्यात आल्याने सर्वसामान्य रुग्णांना त्याचा मोठा फटका बसणार आहे. खासगी रुग्णवाहिकेची सेवा ११ रुपये प्रति किलोमीटरप्रमाणे उपलब्ध असताना सेवा देणाऱ्या महापालिकेच्या रुग्णवाहिकेसाठी १५ रुपये आकारले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

नगरसेवकांची नाराजी

रुग्णवाहिकेच्या दरात वाढ करताना विश्वासात घेण्यात आले नसल्याने लोकप्रतिनिधींनीही प्रशासनाच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. महापालिकेची रुग्णवाहिका ही उत्पन्नाचे साधन नसून ती एक सेवा आहे. त्यामुळे केलेली दरवाढ प्रशासनाने ताबडतोब मागे घेतली पाहिजे. रुग्णवाहिकेसाठी यापुढे कोणतेही शुल्क न घेता ती मोफत उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी मागणी केली असल्याची माहिती वरिष्ठ नगरसेवक मदन सिंह यांनी दिली.

रुग्णवाहिकांना वगळले नाही

महापालिकेची निवडणूक होण्याआधी झालेल्या महासभेत महापालिकेच्या रुग्णसेवांचे दर ठरविण्याचा प्रस्ताव महासभेपुढे आला होता. महापालिकेच्या रुग्णालयात तसेच आरोग्य केंद्रात देण्यात येणाऱ्या विविध सेवांचे दर या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. याआधी महापालिकेने रुग्ण सेवांचे दर निश्चित केले नसल्याने काही सेवा रुग्णांना देता येत नव्हत्या. त्यामुळे शासनाच्या आरोग्य विभागाकडून सरकारी रुग्णालयात आकारले जाणारे दरच या प्रस्तावात घेण्यात आले होते. यात रुग्णवाहिकेचाही समावेश होता. खरे तर या प्रस्तावातून रुग्णवाहिका वगळणे आवश्यक होते, परंतु तसे न झाल्याने शासनाचे ठरवून दिलेल्या दरानुसार रुग्णवाहिकेचे दर त्यावेळी मंजूर करण्यात आले आणि त्याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसू लागला आहे.

रुग्णवाहिकेच्या दरात झालेल्या वाढीचा निर्णय मागे घेण्याबाबत विचार करण्यात येत आहे. डिझेलचे वाढलेले दर आणि देखभालीचा खर्च लक्षात घेऊन रुग्णवाहिकेचे दर लवकरच निश्चित करण्यात येतील.

डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त, मीरा-भाईंदर महापालिका