आयुक्त जयस्वाल यांच्या पहाणीनंतर हरित पथ पुन्हा पुर्ववत करण्याचे आदेश
पाचपाखाडी परिसरातील हरित पथावर आलेले गंडांतर अखेर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दूर केले आहे. हरित पथाच्या काही भागावर बुलडोझर चढविल्याने या ठिकाणी सकाळ-सायंकाळ फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या आबालवृद्धांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत होता. यासंबंधीचे सचित्र वृत्त ‘ठाणे लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते. आयुक्त जयस्वाल यांनी बुधवारी सायंकाळी उशिरा अभियंत्यांच्या पथकासह या ठिकाणची पाहणी केली. त्यानंतर हरित पथ पूर्ववत करावेत, असे आदेश त्यांनी संबंधितांना दिले.
ठाणे महापालिकेने वेगवेगळ्या ठिकाणी सेवा रस्ते आणि महामार्गाला थेट जोडण्याचे काम हाती घेतले आहे. या नियोजनाचा एक भाग म्हणून महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने पाचपाखाडी भागातील हरित पथावर बुलडोझर चालविण्यास सुरुवात केली आहे. कुणालाही विश्वासात न घेता हरित पथाचा काही भाग तोडण्याचे काम सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता. यासंबंधीचे सचित्र वृत्त ठाणे ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते. बुधवारी सायंकाळी उशिरा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या ठिकाणची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, उपायुक्त संदीप माळवी तसेच अभियांत्रिकी विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रहिवाशांसाठी सोयीचे ठरलेल्या हरित पथावर कारवाई करणे योग्य होणार नाही, असे मत या वेळी जयस्वाल यांनी व्यक्त केले. तसेच पथ तोडण्याचे काम तातडीने थांबविण्यात यावे, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. महामार्ग आणि सेवा रस्ते जोडण्यासाठी अन्य पर्यायांचा विचार करावा, असे आदेशही त्यांनी या वेळी दिले.