ठाणे महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ संस्थेचा उपक्रम
शहरातील सिग्नलवर गजरे, फुले आणि प्लास्टिकच्या वस्तू विकणाऱ्या मुलांच्या नशिबी शालेय शिक्षण कधीच येत नसते. उदरनिर्वाहासाठी कुटुंबासह वणवण करत भटकण्याशिवाय या मुलांसमोर पर्याय नसतो. घर नसल्याने शाळेमध्येही प्रवेश मिळत नाही आणि तसेच सिग्नलवरचे जगणे सुरू राहते. हे चित्र पालटण्यासाठी ठाणे महापालिकेने पुढाकार घेतला असून येत्या शैक्षणिक वर्षांत ठाणे महापालिका पहिलीवहिली सिग्नल शाळा सुरू करणार आहे. त्यामुळे सिग्नलवर फिरणाऱ्या चिमुकल्यांच्या हातामध्ये फुलांच्या ऐवजी पाटी पेन्सील दिसणार आहे. १५ जून रोजी शहरातील तीन हात नाक्यावर ही पहिली सिग्नल शाळा सुरू होणार आहे.
ठाण्यातील रस्त्यावरील सिग्नलवर राहणाऱ्या स्थलांतरित कुटुंबातील मुलांसाठी तीन हात नाका या सिग्नलवर पहिली शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे तीन हात नाका व आजूबाजूच्या परिसरातील शाळाबाह्य़ मुलांना या शाळेचा फायदा घेता येणार आहे. मध्येच शाळा सोडलेल्या, स्थलांतरणामुळे शाळेत जाऊ न शकणाऱ्या सर्व मुलांना त्यांच्या हक्काचे शिक्षण इथे मिळू शकणार आहे. ठाण्यातील समर्थ भारत व्यासपीठ ही सामाजिक संस्था सिग्नल शाळेचे व्यवस्थापन करणार आहे.
संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मार्च महिन्यातच तीन हात नाका, कॅडबरी या सिग्नलवरील उदरनिर्वाहासाठी वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांचे प्राथमिक स्वरूपात सर्वेक्षण केले. त्यानुसार या दोन सिग्नलवर एकूण ६ कुटुंबांचे वास्तव्य आढळले. बीड, उस्मानाबाद यांसारख्या दुष्काळग्रस्त भागातून आलेली ही कुटुंबे उदरनिर्वाहासाठी गजरा, फुले, प्लास्टिक खेळणी विकण्याचे काम करतात. या कामात त्यांची मुलेही मदत करतात किंवा रस्त्याशेजारी खेळत असतात. ही सर्व मुले प्राथमिक शिक्षण घेण्याच्या वयाची आहेत. भटकंतीमुळे मुलांना शाळेत पाठवणे शक्य होत नाही. परंतु, शाळा त्यांच्या दारातच येणार असेल तर पालक आनंदाने मुलांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली आहे. या शाळेमुळे रस्त्यावरील या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणणे शक्य होणार आहे.

सिग्नल शाळेची कार्यपद्धती..
सिग्नलवरील कुटुंबाशी संवाद साधून त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून देण्यात येणार आहे. येथील मुलांचे वयोगटानुसार आणि बोलीभाषेनुसार वर्गवारी करून अहवाल तयार केला जाईल. परिसरातील शाळेशी सिग्नल शाळा जोडण्यात येणार असून पोषण आहार, पाठय़पुस्तके, शालेय वस्तू आणि शैक्षणिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. बोलक्या भिंती, तात्पुरती शेड आणि शिक्षकांची नियुक्ती करून मुलांची शैक्षणिक पातळीवर उंचावली जाईल. मुलांना चाकोरीबाहेर हसतखेळत शिक्षण देण्यात येणार आहे. केवळ शालेय शिक्षणावर भर न देता कौशल्य विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. मुलांमधील कला समजून घेऊन त्याला प्राधान्य दिले जाणार आहेत. त्याबरोबच शिक्षण घेताना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी ऊर्मिला पारधे यांनी दिली. प्रत्येक आठवडय़ाला मुलांच्या अभ्यासाचे शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यमापन केले जाणार आहे.