अमन भालेरावची प्रात्यक्षिक स्पर्धेसाठी निवड

प्रतिकूल परिस्थितीमुळे  पालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थीही योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले तर चमकदार कामगिरी करू शकतात, हे बदलापूर पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. कुळगांव-बदलापूर नगरपालिकेच्या शाळेच्या इतिहासात प्रथमच होमी भाभा या वैज्ञानिक स्पर्धात्मक परीक्षेला बसून विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. पालिका शाळेचे एकूण नऊ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच अमन भालेराव या विद्यार्थ्यांची पुढील प्रात्यक्षिक स्पर्धेसाठी निवड झाली असल्याने त्याच्यासह अन्य विद्यार्थ्यांचे पालिकेकडून कौतुक करण्यात येत आहे.

बदलापूर नगरपालिका शाळेतील विद्यार्थी हे नजीकच्या गावांतील गरीब कुटुंबातले असून, काही विद्यार्थी परिसरातील पाडय़ांवरचे आहेत. त्यामुळे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही शाळेत उपस्थित राहणे हीच त्यांच्यासाठी आव्हानात्मक बाब आहे. मात्र, या परिस्थितीवर मात करत पालिकेच्या शाळेतील या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मोठी मजल मारत होमी भाभा वैज्ञानिक स्पर्धेत उत्तीर्ण होण्याची कामगिरी केली आहे. ही मुले पालिकेच्या ज्युवेली व कुळगाव मराठी शाळांमधील असून, अमन भालेराव, कसक जमदरे, सुयोग आरेकर, सुहास गरदकर, खुशी छारी, मयुरी कांबळे, शुभांगी राठोड, प्रथमेश ओव्हाळ, प्रवीण भजनावळे, तुलसी जाधव, प्रतीक्षा शिंगोळे, वैष्णवी कारडे, विजयदत्त इंगळे अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. या विद्यार्थ्यांवर विशेष मेहनत मुख्याध्यापिका माधुरी घायवट व सुरेखा राऊत आदी शिक्षकांनी घेतली असल्याचे पालिकेचे शिक्षण विभागप्रमुख विलास जडये यांनी सांगितले.