५ जून रोजी हिरव्या देवाची जत्रा; रानभाज्या, वनौषधी स्पर्धा 

वन हक्क कायद्यान्वये मिळालेल्या सामूहिक वनपट्टय़ांवरील जंगल उत्तम प्रकारे राखल्यानंतर मुरबाडमधील ग्रामस्थांनी आता ‘गाव तिथे देवराई’ हा उपक्रम हाती घेतला आहे.

आदिवासी आणि जंगल यांच्यातील ऋणानुबंध अधिक दृढ व्हावेत म्हणून गेल्या काही वर्षांपासून श्रमिक मुक्ती संघटना आणि वन निकेतन या संस्था यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुरबाडमध्ये हिरव्या देवाची यात्रा भरविण्यात येते. पानांवरून वृक्ष ओळखण्याची वृक्षमित्र स्पर्धा, जंगलातून गोळा केलेल्या वस्तूंपासून बनविलेली रांगोळी, स्थानिक भागातील वनौषधींचे प्रदर्शन, रानभाज्यांची स्पर्धा आदी यात्रेत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो.

गेल्या वर्षी रानभाज्यांचे प्रदर्शन कल्याण तसेच ठाणे इथेही भरविण्यात आले होते. यंदाच्या यात्रेत ‘गाव तिथे देवराई’ या उपक्रमाची सुरुवात केली जाईल, अशी माहिती संस्थेच्या अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी दिली.

यंदाची हिरव्या देवाची जत्रा ५ जून रोजी तालुक्यातील भांगवाडी (माळ) येथे भरणार असली तरी या अभियानाची सुरुवात रविवार, २१ मे रोजी वैशाखरे येथील मोहवाडीत होईल.

केव्हारवाडी व बनाची वाडी (२२ मे), शिरवाडी-चाफे (२४ मे), सोनावळे-भेरेवाडी (२५ मे), दुर्गापूर-मोरववाडी-वाघवाडी (२७ मे), दिवाणपाडा (२८ मे), शिसेवाडी-झाडकर (३० मे), भांगवाडी ( ३१ मे), करपटवाडी-झाडघर (२ जून), पेजवाडी-फांगणे (३ जून) येथे जंगल पर्यावरण संवर्धन जागृती कार्यक्रम होतील. यंदाच्या यात्रेत रासायनिक खते व कीटकनाशके न वापरता पिके घेणाऱ्या पाच शेतकऱ्यांचा विषमुक्त शेतकरी हा पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.

मुरबाडमधील विविध गावांनी जंगल संवर्धनाबाबत चांगली कामगिरी केली आहे. गाव तिथे देवराई रुजविण्याचा संकल्पही चांगला असून त्यासाठी वन विभाग त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल.

तुकाराम हिरवे, वन परिक्षेत्र अधिकारी, टोकावडे