मदत न करणाऱ्या दोन पोलीस उपनिरीक्षकांसह एका हवालदाराचे निलंबन

ऑमलेट पावचे चार रुपये न दिल्याने एका इसमाला आपला प्राण गमवावा लागला. ऑमलेट विक्रेता आणि त्याच्या दोन साथीदारांनी चाकूने त्याची हत्या केली. नालासोपारा पूर्वेच्या तुळींज पोलीस ठाण्यासमोरच हा प्रकार घडला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस ठाण्यात मदत मागण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी त्याला हाकलून दिले. या प्रकरणात गुन्हा दाखल न करता हलगर्जी केल्याप्रकरणी दोन पोलीस उपनिरीक्षकासह अन्य एका पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

गोरखनाथ ऊर्फ रवी भागवत  (४०) हा पालिकेचा सफाई कर्मचारी असून तो विरारच्या डोंगरपाडा येथे राहतो. शनिवारी रात्री भागवत आपल्या मित्रासह तुळींज पोलीस ठाण्यासमोर एका हातगाडीवर ऑमलेट-पाव खाण्यासाठी गेला होता. त्याचे बिल २४ रुपये झाले होते. मात्र भागवत याने केवळ २० रुपये दिले. उर्वरित ४ रुपयांवरून भागवत आणि राजूत वाद झाला. त्यानंतर विक्रेता राजू आणि त्याच्या दोन साथीदारांनी चाकूने भागवतवर हल्ला केला. भागवतने रक्तबंबाळ अवस्थेत समोरच असलेल्या तुळींज पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र तेथील पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून भागवतला हाकलवून लावले. भागवतच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी त्याला कांदिवलीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही बाब समजताच पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी पोलीस उपनिरीक्षक भरत छापाणे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद मेहेंदळे आणि पोलीस हवालदार विजय राऊत यांना निलंबित करून त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तु़ळींज पोलिसांनी रविवारी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी विक्रेता राजू, त्याचा साथीदार महेश याला अटक केली आहे तर तिसरा आरोपी फरार आहे.