उल्हासनगरच्या हिराघाट परिसरात राहणारा रमजान शेख त्या दिवशी त्याच्या नियमितवेळी घरी येतो सांगून गेला होता. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत रमजान घरी आला नव्हता. चिंतातुर शेख कुटुंबीयांनी अखेर त्याच्या मित्रमंडळींकडे व नातेवाईकांकडे संपर्क साधण्यास सुरुवात केली. पण, रमजानचा काही पत्ता लागला नाही. २५ जुलैला शोध घेऊनही रमजान न सापडल्याने अखेर दोनच दिवसांत २७ जुलैला रमजानची बहीण नूरजहाँ शेख हिने सेंट्रल पोलीस ठाणे येथे स्वतचा भाऊ हरवल्याची तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर चार-पाच दिवस गेले तरी, रमजान घरी आला नव्हता व पोलिसांनाही रमजानचा शोध लागला नव्हता. शेख कुटुंबीयांची चिंता वाढत होती
एके दिवशी चिंतेत असणाऱ्या नूरजहाँचा मोबाइल खणखणला. ऑगस्ट महिन्याची ती एक तारीख होती. फोनवरून एक अज्ञात तरुण काहीसा उद्धटपणेच तिच्याशी बोलू लागला. मात्र, पुढे त्याने उच्चारलेल्या वाक्याने नूरजहॉँच्या पायाखालची जमीन सरकली होती. तो हिंदीत बोलला, मैने रमजान को मार के शहाड ब्रीज के नीचे फेक दिया है. तिने तत्काळ सेंट्रल पोलीस ठाणे गाठले आणि या दूरध्वनीबाबतची माहिती दिली. असा दूरध्वनी आल्याची माहिती सांगताच पोलीसही चक्रावले. तितक्यात त्या अज्ञात तरुणाचा दूरध्वनी परत आला आणि त्याने पुन्हा रमजानला ज्या ठिकाणी मारून टाकले, तिथला पत्ता सांगितला. पोलीसही त्याच्याशी बोलले. मात्र तो त्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
त्या अज्ञात तरुणाने दिलेल्या पत्त्यावर पोलीस नूरजहॉँसह तिथे पोहचले. तिथे एका नाल्यात ३३ वर्षीय रमजानचे प्रेत छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडले होते. नूरजहॉँने हंबरडाच फोडला होता. गेल्या काही तासात तिला आलेला अनुभव हृदयद्रावक होता. शहाड येथील उड्डाणपुलाखालचाच तो नाला होता. मात्र, हा नाला महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्याने तेथील पोलिसांना पाचारण करण्यात आले. मुंबईच्या जे. जे. रुग्णालयामध्ये मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. मात्र मृतदेह सेंट्रल पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने गुन्हा सेंट्रल पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. लागलीच कोणताही वेळ न दवडता पोलिसांचे तपासचक्र फिरू लागले. उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त वसंत जाधव व सहाय्यक पोलीस आयुक्त विकास तोटावार यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट्रल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय सायगावकर यांच्या साथीने पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल भिसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जाधव व पोलीस कर्मचारी आदींनी तपासकार्याला सुरुवात केली. पोलिसांनी मित्र व नातेवाईकांकडे चौकशीला सुरुवात केली. रमजान हरवल्यानंतर त्याचा आतेभाऊ हुसैन शेख बेपत्ता होता. नूरजहाँला आलेला मोबाइल क्रमांक पोलिसांनी तपासला. मात्र त्यावरून कोणताही पत्ता लागला नाही.
पोलीस हुसैन शेखच्याही शोधात होते. कारण, २६ वर्षीय हुसैन शेख हा गुन्हेगारी पाश्र्वभूमीचा होता. त्याच्या गावी चाळीसगावला पोलिसांचे एक पथक रवाना झाले. मात्र तिथे त्यांच्या हाती काही लागले नाही. तसेच पोलिसांच्या दुसऱ्या एका पथकाने कल्याण, मुंब्रा भागातही त्याचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. मात्र, ६ ऑगस्टला हुसैन उल्हासनगर येथील गोल मैदान येथे येणार असल्याचे पोलिसांना विश्वसनीय सूत्रांकडून कळले. पोलिसांनी गोल मैदान परिसरात सापळा लावला आणि हुसैन शेख यास ताब्यात घेतले. पुढील चौकशीत हुसैनने आपल्या गुन्ह्य़ाची कबुली दिली.
हुसैनला दारूचे व्यसन होते. रमजान शेख हा त्याच्या मामाचाच मुलगा होता. २५ जुलैच्या सायंकाळी उशिरा हुसैन व रमजान दारू पीत बसले होते. मात्र, दारूचे पैसे देण्याच्या कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. एकमेकांशी भांडतच ते शहाड येथील पुलावर आले होते. तेथे आल्यावर त्यांच्या बाचाबाचीचे पर्यवसान मारामारीत झाले. या मारामारीत रागाच्या भरात हुसैनने आपल्याजवळील ब्लेड बाहेर काढत त्याने रमजानच्या मानेवर वार केला. रक्तस्राव झाल्याने रमजान कोसळला, तेव्हा हुसैनने त्याला शहाड पुलाखालील नाल्यात फेकून देत तेथून पोबारा केला. अत्यंत निर्घृणपणे त्याने आपल्या मामाच्या मुलाची हत्या केली होती. मात्र, आठवडाभराने त्याला या कृत्याबद्दल रमजानच्या कुटुंबीयांची दया आली. त्याने पुन्हा दारूच्या नशेत रमजानची बहीण नूरजहाँला दूरध्वनी करून रमजानच्या मृतदेहाची माहिती दिली. सध्या हुसैन शेख आधारवाडी तुरुंगात शिक्षा भोगत आहे.