अनंत वझे संगीत, कला व क्रीडा प्रतिष्ठान ही कल्याणात कार्यरत असणारी संस्था गेली २० वर्षे संगीत, कला, क्रीडा व आरोग्य क्षेत्रांत कार्यरत असून संस्थेतर्फे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून संस्थेच्या वतीने दर वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. ‘प्रतिष्ठान’ आणि ‘गुरुकृपा कला साधना केंद्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ज्ञानकर्मी जे. के. पानसरे’ स्मृतिदिनानिमित्त ‘गुरुवंदना’ हा कार्यक्रम नुकताच कल्याणातील अत्रे रंगमंदिर येथे पार पडला. कार्यक्रमात विद्यालयातील ६० विद्यार्थिनींनी कथक नृत्याचे विविध नृत्याविष्कार सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदना व श्रीकृष्ण वंदनेने करण्यात आली. झप ताल या तालामध्ये तोडे, चक्करदार, परन आदी नृत्य प्रकारांचे सादरीकरण विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी केले. त्याचप्रमाणे कार्यक्रमातील ३६ विद्यार्थ्यांनी सादर केलेली तबला व नृत्याची अनोखी जुगलबंदी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली. विद्यालयाच्या शिक्षिका अमृता साळवी यांनी रूपक तालामध्ये एकल नृत्य सादर केले. ‘विठ्ठल विठ्ठल आळवीत आला’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.