अनधिकृत बांधकामे आणि सिमेंट-काँक्रीटचे जंगल अशी मीरा-भाईंदरची ओळख पुसून निसर्गाशी नाते सांगणारे व कला संस्कृतीशी जवळीक साधणारे शहर असा चेहरा या नगरीला देण्याचा मीरा-भाईंदर महापालिकेचा प्रयत्न आहे. याच संकल्पनेतून पंचेंद्रिये आणि संगीत यांच्यावर आधारित दोन उद्याने मीरा रोड येथे आकाराला येत आहेत.
डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही मानवाची पंचेंद्रिये. मानवाच्या या प्रत्येक अवयवाला स्वत:ची अनुभूती असते. या सर्वाची अनुभूती उद्यानाच्या माध्यमातून मिळावी ही मूळ संकल्पना डोळ्यासमोर ठेवून मीरा रोड येथील रामदेव पार्क परिसरात तब्बल पाच एकर जागेवर पंचेंद्रिये उद्यान साकारले जात आहे. उद्यानाची रचना करताना विविध प्रकारची सुवासिक फुलझाडे, फळझाडे, हिरवळ यांचा समावेश या उद्यानात करण्यात येत आहे. यातही सपाट हिरवळ, छोटे उचंवटे केलेली हिरवळ असे प्रकार करण्यात आले असून झाडांच्या मधून जाणारी छोटी पायवाट बांधण्यात येत आहे. पायवाटेवरून चालताना डोळ्यात निसर्गसौंदर्य साठविण्यासोबतच विविध पक्ष्यांचे कानाला मधूर वाटणारे संगीत, सुखद वाटणारा हिरवळीचा स्पर्श, फुलांचा सुवासिक गंध असा माणसाची पंचेंद्रिये जागृत करणारा विलक्षण अनुभव या उद्यानातून मिळावा ही कल्पना या उद्यानाच्या निर्मितीमागे आहे.
उद्यानाच्या मधोमध तलाव बांधण्यात येत असून तो हुबेहूब नैसर्गिक वाटावा असा प्रयत्न आहे. त्यावर बांधण्यात येणारा छोटा पूलही आकर्षणाचा एक भाग असणार आहे. उद्यानाचा मनमुराद आनंद घेण्यासोबतच खुली व्यायामशाळा, जॉगिंग ट्रॅक, मुलांना खेळण्यासाठी खुली जागा अशा सर्व वयोगटांतील नागरिकांना या उद्यानाचा लाभ होईल, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. उद्यानाचे आराखडे पुण्याचे प्रसाद गोखले यांनी तयार केले आहेत. उद्यानासाठी महापालिका सुमारे पाच कोटी रुपये खर्च करत आहे.

कला-संस्कृती जोपासण्यासाठी
पंचतत्त्वासोबतच कला व संगीत हे मानवाच्या जीवनावर फार मोठा प्रभाव टाकत असतात. त्यामुळेच कला-संस्कृती असे नाव असलेले उद्यान एक एकर जागेवर निर्माण केले जात आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारावर बासरीची प्रतिकृती असलेले कारंजे आपले स्वागत करणार आहे. उद्यानात प्रवेश केला की हार्मोनियम, तबला, सतार यांच्या भव्य प्रतिकृती मांडण्यात येत आहेत. त्यालगत असलेल्या फलकावर वाद्य व ते वाजविणाऱ्या प्रसिद्ध कलाकारांची माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर एक खुला रंगमंच उभारण्यात येत असून त्यावरील भिंतींवर महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे लिखित ‘बटाटय़ाची चाळ’या कथेतील दृश्य साकारण्यात येणार आहेत. याशिवाय उद्यानात एक चित्रफितीची प्रतिकृती उभारून त्यावर चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या चित्रपटांचे पोस्टर्स, कलाकारांची माहिती संकलित करण्यात येणार आहे.