गणेशोत्सवाच्या तोंडावर वाद्यांच्या किमतीत ५ ते १५ टक्के वाढ

वस्तू-सेवा कर अर्थात जीएसटीचा फटका अनेक सण-उत्सवांनाही बसत आहे. गणेशोत्सव काळात आरती आणि भजनासाठी लागणारी चामडय़ाची वाद्ये जीएसटीमुळे महाग झाली आहेत. दुकानातही त्यांचा तुटवडा होत असून भाविकांची गैरसोय होत आहे.

गणेशोत्सवात भजनासाठी चर्मवाद्यांची गरज असते. दरवर्षी गणेशोत्सवाच्या तोंडावर वाद्ये खरेदीसाठी वाद्यांच्या दुकानात गर्दी होत असते. मात्र यंदा ही गर्दी ओसरल्याचे चित्र आहे. जीएसटी लागल्यामुळे वाद्यांच्या किमती वाढल्या आहेत. वाढीव किमतीमुळे किरकोळ विक्रेत्यांकडे येणाऱ्या मालातही कपात झाली आहे. वेळेवर माल येत नसल्याच्या तक्रारी किरकोळ विक्रेत्यांनी केली आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांनी नवीन वाद्ये खरेदी करण्यापेक्षा जुनी वाद्येच दुरुस्त करून घेण्यास सुरुवात केली आहे.

‘‘आमच्याकडे नवीन वाद्याऐवजी जुनी वाद्ये दुरुस्तीसाठी येत आहेत. सध्या दररोज ४ ते ५ वाद्ये दुरुस्त करून दिली जातात. कच्छी, ढोल, शाळेचे ड्रम, फायबर आदी वाद्ये दुरुस्तीसाठी येत आहे,’’ असे आनंदनगर येथील आनंद म्युझिकल सेंटरचे मालक अनंत पवार यांनी सांगितले.

ढोलकी, मृदंग, काही भजनात किंवा आरतीसाठी वापरले जाणारे ड्रम, मिरवणुकीत वापरले जाणारे ढोल, डफ वाद्यांना गणेशोत्सव काळात मागणी असते. मात्र यंदा केंद्र शासनाने लागू केलेल्या जीएसटीमुळे या वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे आर्थिक फटका बसण्याची भीती दुकानदारांनी व्यक्त केली आहे.

जीएसटी मुळे तांबा, पितळ, स्टील यांसह चामडय़ाचे भाव वाढले आहे. त्यामुळे सर्व वाद्ये किमान ५ टक्कय़ांपासून १५ टक्कय़ांनी महागली आहेत. दरवर्षी या वस्तूंना मोठी मागणी असते. परंतु आता कच्च्या मालाचा भाव वाढल्याने वाद्ये  महाग झाली आहेत.

– अनंत पवार, मालक, आनंद म्युझिकल सेंटर