बारावी परीक्षेच्या एक दिवस आधीच साप पकडणे एका सर्पमित्र विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतले. विषारी नागाने दंश केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. अवीस मिस्त्री असे या तरुणाचे नाव आहे.

नायगावला राहणारा अवीस मिस्त्री (१७) हा मुलगा एका संस्थेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून सर्पमित्र म्हणून काम करत होता. यंदा तो बारावीला होता आणि मंगळवारपासून त्याची परीक्षा सुरू होणार होती. रविवारी घराजवळील झुडपात विषारी नाग असल्याची माहिती त्याला मिळाली. अवीसने झुडपातून त्या सापाला पकडले, त्याच्याबरोबर छायाचित्रदेखील काढला. या नागाला खाडीजवळील तिवरांमध्ये सोडण्यासाठी नेले असताना या सापाने त्याच्या उजव्या हातावर दंश केले. सापाने दंश केले असतानादेखील अवीसने सापाला झुडपात सुरक्षित सोडून दिले आणि त्यानंतर स्वत:ला ‘पेटिट सिव्हिल हॉस्पिटल’ या रुग्णालयात दाखल करून घेतले. नंतर त्याला पुढील उपचारासाठी तुळिंज येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी संध्याकाळी शरीरात विष पसरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

पुन्हा सर्पदंश

गेल्या सहा वर्षांपासून अवीस हा विषारी साप पकडून त्यांची सुटका करत असे. अवीस पारंपरिक पद्धतीने साप पकडत असे आणि साप पकडण्यासाठी रॉडचा वापरही करत असे. यापूर्वीदेखील अवीसला सर्पदंश झाला होता, परंतु त्या वेळी त्याने पेटिट रुग्णालयात दाखल करून स्वत:ला वाचवण्यात यश मिळवले होते. या वेळी मात्र अवीस दुर्दैवी ठरला. त्याच्या अशा मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.