‘रंगोत्सव’मध्ये शास्त्रीय संगीताच्या मैफली; लघुपटांची स्पर्धा

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नासीरुद्दीन शाह यांच्या भूमिकांनी चित्रपट रसिकांना भुरळ घातली असून या अभिनेत्याशी थेट संवाद साधण्याची संधी ठाणेकरांना मिळणार असून ‘इंद्रधनु’ संस्थेच्या ‘रंगोत्सव’ या वार्षिकोत्सवाच्या निमित्ताने हा योग जुळून आला आहे.
पद्मपुरस्कार प्राप्त आणि अभिनयाच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित या अभिनेत्याच्या या क्षेत्रातील सुरुवातीचा काळ त्याचा चित्रपट क्षेत्रातील प्रवेश आणि त्यानंतरचे यश या सगळ्याचा अनुभव प्रत्यक्षपणे त्यांच्याच तोंडून ऐकता येणार आहे. गुरुवार ३ डिसेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान हा महोत्सव श्री समर्थ सेवक मंडळाच्या पटांगणामध्ये होणार असून याबरोबरच ठाण्यातील सुप्रसिद्ध सतारवादक शेखर राजे, बेस्ट सेलर लेखक सुदीप नगरकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या कलांचा आविष्कार ‘इंद्रधनु’च्या व्यासपीठावरून अनुभवता येणार आहे.
वैविध्यपूर्ण कार्यक्रम, आशयघन मुलाखती आणि कर्णमधुर संगीताच्या मैफलींचा संयुक्त आविष्कार सादर करणारा ‘इंद्रधनु रंगोत्सव २०१५’ची घोषणा करण्यात आली असून यंदा या महोत्सवामध्ये अनेक दिग्गज आपली उपस्थिती नोंदविणार आहेत. गुरुवार ३ ते ६ डिसेंबरदरम्यान रंगणाऱ्या या महोत्सवाच्या प्रत्येक दिवशी नावीन्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल या कार्यक्रमात अनुभवता येणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी गुरुवार ३ डिसेंबर रोजी इंद्रधनु लघुपट स्पर्धा पार पडणार आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहाच्या मिनी थिएटरमध्ये ही स्पर्धा होणार आहे. तर शनिवार ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘अंतरंग सतारी’चे हा ठाण्यातील सुप्रसिद्ध सतारवादक शेखर राजे आणि त्यांच्या शिष्यगणांचा मनोवेधक सांगीतिक कार्यक्रम होणार आहे.
हिंदी-मराठी लोकप्रिय गीते सतारीवर ऐकतानाच त्या वाद्यांची तांत्रिक माहिती, वादनाची पद्धत, त्यातील घराणी, त्यांची वैशिष्टय़े, किस्से आणि भारतीय शास्त्रीय व सुगम संगीत क्षेत्रातील सतारीचे संपन्न वाटचाल नागरिकांना अनुभवता येणार आहे. याबरोबरच सुधीर फडके युवोन्मेष आणि युवोन्मेष पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. डॉ. रेवा नातू यांना सुधीर फडके युवोन्मेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर सुदीप नगरकर यास युवोन्मेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
रात्री ८ वाजता अभिनेता नासीरुद्दीन शहा यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. विजय केंकरे त्यांच्याशी संवाद साधणार आहे. तर रविवार ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता ठाण्यातील बेस्ट सेलर लेखक सुदीप नगरकर याच्याशी संवाद साधणारा कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी ६.३० वाजता ‘टुगेदरनेस’ हा कार्यक्रम होणार असून स्वरप्रज्ञ पं. मिलिंद रायकर यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमात मुग्धा वैशंपायनचे गायन, यज्ञेश रायकरचे व्हायोलिन वादन यांचे सादरीकरण होणार आहे.