‘सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा, हम बुलबुले है उसकी..’ ठाण्यातील राम मारुती रोडवरून जाताना सकाळी बँडच्या तालबद्ध ठेक्यावर हे देशभक्तीपर गीत ऐकताना आपल्या मनातील देशप्रेमाची भावना अधिकच दृढ होते. बँडपथकातील विविध वाद्यांच्या मिलाफातून, वादकांच्या वादन कौशल्याचा संस्मरणीय अनुभव देताना अपेक्षित परिणाम साधणे हेच बँडपथकाचे वैशिष्टय़ असते. न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांच्या बँडपथकाचा सराव पाहताना शाळेच्या विद्यार्थ्यांचे कौतुक वाटते.
खरे तर बँडपथक म्हटल्यावर राष्ट्रीय दिनांच्या निमित्ताने जे कार्यक्रम आयोजित केले जातात, तेव्हाचे ध्वजवंदन, शिस्तबद्ध संचलन आणि आपल्या वादनाने त्या कार्यक्रमाला उंची प्राप्त करून देणारे बँडपथक असे चित्र डोळ्यासमोर येते. हा विद्यार्थ्यांचा सराव पाहताना, १५ ऑगस्टच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात आपले प्रदर्शन उत्तम होण्याची जिद्द अनुभवताना एक वेगळा अनुभव येतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना आत्मविश्वास प्राप्त व्हावा, त्यांच्यात संघभावना निर्माण व्हावी अशा व्यापक उद्देशाने मुख्याध्यापिका वैशाली चव्हाण यांनी बँडपथकाचा उपक्रम शाळेत राबवायला सुरुवात केली. ठाणे शहरातील शालेय विद्यार्थ्यांचे हे एकमेव बँडपथक आहे ही गोष्ट आवर्जून नमूद करण्याजोगी! २००८ पासून या शाळेचे बँडपथक कार्यरत आहे. शाळेतील स्नेहसंमेलन किंवा इतर महत्त्वपूर्ण कार्यक्रमांच्या (१५ ऑगस्ट, २६ जाने. इ. राष्ट्रीय दिन, प्रदर्शन इ.) वेळी बँडपथकाचा आवर्जून समावेश केला जातो. पण ठाण्यात ठाणे महापालिका, जिल्हा परिषद किंवा महाराष्ट्र शासनातर्फे जे अनेकविध कार्यक्रम आयोजित केले जातात, तेव्हा या बँडपथकाला आवर्जून आमंत्रित केले जाते. विद्यार्थ्यांच्या विकासाला प्राधान्य देत या शाळेमध्ये वर्षभर अनेकविध उपक्रम सातत्याने राबवले जातात. बँडपथक स्थापन करणे हा काहीसा आगळावेगळा प्रयत्न होता आणि अशा तऱ्हेने सरकारी, शासकीय कार्यक्रमांमध्ये संधी मिळणे हे शाळा आणि विद्यार्थी यांच्या प्रयत्नांचेच फलित आहे. इथे अशा तऱ्हेने मुलांना पाठिंबा देणाऱ्या पालकांचेही आवर्जून अभिनंदन करायला हवे!
बँडपथक स्थापन करणे आणि त्यात सातत्य राखणे हे खरे तर आव्हानच असते. विद्यार्थी आणि पालकांचे सहकार्य, वाद्यांची जमवाजमव आणि अनुभवी मार्गदर्शकांकडून वर्षभर सराव इ. गोष्टी सध्याच्या अभ्यासाच्या जीवघेण्या स्पर्धेत साधणे हे सोपे नाही. पण मुख्या. वैशाली चव्हाण यांनी विचारपूर्वक बँडपथक स्थापन केले. त्यासाठी प्रफुल्ल कोळी यांची बँडपथकाच्या सरावासाठी नियुक्ती केली आहे आणि वर्षभर ठरावीक दिवशी सराव केला जातो. १५ ऑगस्ट या महत्त्वपूर्ण दिनासाठी विद्यार्थी गेला महिनाभर कसून सराव करीत आहेत. अनिल सूर्यवंशी या शाळेतील शिक्षकाकडे बँडपथकाची जबाबदारी सुपूर्द करण्यात आली आहे.
ही संयुक्त विद्यार्थ्यांची शाळा असल्याने बँडपथक विद्यार्थ्यांबरोबर विद्यार्थिनींचाही आवर्जून समावेश केला जातो. इ.५वी ते इ.१०वीमधील ३० ते ४० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. विद्यार्थ्यांची आवड, शारीरिक क्षमता, मेहनतीची तयारी, तालासुराची थोडीफार समज इ. गोष्टी निवड करताना लक्षात घेतल्या जातात. विद्यार्थ्यांशी, पालकांशी संवाद साधून, त्यांची अनुमती घेऊन मग अंतिम निवड केली जाते. मग विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा अंदाज घेऊन, वाद्ये दिली जातात आणि मग टप्प्याटप्प्याने सरावाला प्रारंभ होतो. बरेच विद्यार्थी पहिल्यांदा वाद्य हाताळतात किंवा काहींना थोडाफार अनुभव असतो, त्यामुळे हे सगळे लक्षात घेऊन कोळी सर प्रशिक्षण देतात. वाद्य कसे धरावे, सूर कसा निघतो, सुरातील चढ-उतार इ. गोष्टी समजावून, प्रात्यक्षिक करून त्यातील बारकावे समजून द्यावे लागतात. त्यांच्याकडून वादनाचे तंत्र घोटवून घ्यावे लागते. वारंवार सराव करावा लागतो. कारण मगच त्यात सातत्य राखता येते. मग त्यांना काही काळाने बँडच्या विशिष्ट धून वाजवायला शिकवले जाते. या बँडमध्ये मोठा ढोल, छोटा ढोल, साइड ड्रम्स, ट्रँगल, खंजिरी, झांज, बासऱ्या इ. वाद्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी वाजवतात. या बँडपथकाचा खास गणवेश आहे आणि शाळेच्या माजी विद्यार्थ्यांने तो पुरस्कृत केला आहे हे विशेष! या बँडपथक विद्यार्थी सदस्यांसाठी हा एक वेगळा अनुभव असतो आणि त्यामुळे विद्यार्थी त्यात खऱ्या अर्थाने स्वत:ला सामावून घेतात. शिकण्याची/आत्मसात करण्याची धडपड करतात आणि विविध कार्यक्रमांतून शाळेचे नाव उज्ज्वल करतात.
साधारणपणे ५वी/६वीत बँडपथकामध्ये निवड झाली की दहावीपर्यंत विद्यार्थी जोडले जातात आणि त्यामुळे ही ४-५ वर्षे केलेली वाटचाल त्यांना खूप काही देणारी असते. वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनी बँडपथकाच्या निमित्ताने एकत्र येतात आणि वादन शिकण्याचा अनुभव घेतात. एकत्र येऊन, संघभावनेने, एक-सूर-एकतालाचा अनुभव देण्याचे कौशल्य आत्मसात करताना एकमेकांना सांभाळून घेण्याचे, सहकार्य करण्याचे, कुरघोडी न करता/ स्पर्धा न करता एकत्रित धून वाजवताना एकदिलाने राहायला शिकतात. नवीन मैत्रीपूर्ण, एकोप्याचे संबंध निर्माण होतात आणि अंगभूत कलागुणांना वाव प्राप्त होताना सृजनशीलतेला जाहीर व्यासपीठ प्राप्त होते. जाहीर कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांसमोर आपली कला सादर करताना स्वत:च्या क्षमतेवरील विश्वास अधिक बळकट होतो. एखाद्या कसोटीच्या क्षणी आपल्या पथकातील त्रुटी दिसू न देता काय करायचे, हे प्रसंगावधान पण आत्मसात करता येते. आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी खरे तर ही एक अनुभवाची समृद्ध शिदोरी असते.
सध्याच्या स्पर्धेच्या युगात मुलांमुलींमधील निकोप नाते वृद्धिंगत होताना या बँडपथकाच्या माध्यमातून संघभावना, परस्पर सहकार्य, एकोपाही वाढीस लागतो. खरे तर साऱ्या समाजातच अशा तऱ्हेच्या भावना वृद्धिंगत होणे ही निकड आहे आणि म्हणूनच वेगळी वाट चोखाळताना बँडपथकाची स्थापना करणाऱ्या या शाळेचा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे.