संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि नागरी लोकवस्ती यांच्या मध्ये विभागणी करणाऱ्या संरक्षण भिंतीला जागोजागी भगदाडे पाडण्यात आली असून त्यामुळे वन्य प्राणी नागरी वस्तीमध्ये घुसण्याचे प्रकार वाढीस लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जागेशेजारी वसलेले लोकमान्य नगर पाडा नं. ४ येथील सावंत चाळ ते चौकी पाडा, संतोष पाटील नगर, डेकलाइन परिसरातील संरक्षण भिंतीला भोगदे पडून काही भिंती कोसळल्याने बाजूलाच असलेल्या जंगलातून काही हिंस्र प्राणी शिकारीच्या शोधात येतात. या परिसरात बिबटय़ाचा वावरही नेहमीचाच झाला आहे. या परिसरातील लहान मुले व नागरिकांवर बिबटय़ाचे हल्ले होण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे या भागातील संरक्षण भिंतीची पूर्ण बांधणी करण्याबरोबरच त्यांतील भगदाडांची दुरुस्ती करण्याची सूचना ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी वन अधिकाऱ्यांना दिली आहे.
वन विभागाच्या वतीने बांधण्यात आलेली जुनी संरक्षण भिंत धोकादायक बनली असून अनेक वेळा ती कोसळण्याचे प्रकार घडू लागले आहे. बुधवारी सकाळी १० वाजता इंदिरानगर येथील संरक्षण भिंत कोसळली. त्यावेळी तेथे खेळणारा अजय सिंग नावाचा मुलगा किरकोळ जखमी झाला. त्यामुळे संरक्षण भिंत तात्काळ दुरुस्त करावी, असा आग्रह नागरिकांकडून केला जात आहे.