नवरात्रोत्सवात ठाण्यात महिला पोलिसांची गस्त

नवरात्रोत्सवात सोनसाखळी चोरीला आळा घालण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी नौपाडा पोलिसांनी ‘दामिनी’ या महिला पोलीस पथकाची स्थापना केली आहे. या पथकात एक महिला पोलीस निरीक्षक, २० महिला पोलीस कॉन्स्टेबल आणि २० महिला पोलीस मित्रांचा समावेश असणार आहे, असे परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांनी सांगितले.

नवरात्रोत्सवात सोनसाखळी चोरी, महिलांबरोबर छेडछाड अशा घटना सातत्याने घडत असतात. त्यामुळे या वर्षीचा नवरात्रोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी नौपाडा पोलिसांनी दामिनी पथकाची स्थापना केली आहे. पोलीस निरीक्षक प्रियतमा मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक असणार आहे. महिलांचे हे पथक नवरात्रोत्सवात छेडछाडीचे गैरप्रकार तसेच सोनसाखळी चोरी या प्रकाराला आळा घालणार आहे. रात्री ७ ते १० या वेळेत हे पथक गस्त घालणार असून यात महिला पोलिसांना दुचाकी देण्यात आली आहे. तसेच पथकातील काही महिला या पायी गस्ती घालणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये शहरातील शाळा, महाविद्यालयात तरुणींवर होणाऱ्या छेडछाडीविरोधात या पथकातील महिला कार्यरत असतील. महिलांबाबतच्या कोणत्याही तक्रारीकरिता १०३ या क्रमांकावर कोणतीही तक्रार आल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. स्वामी यांनी सांगितले.