ठाणे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेविना मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या मुद्दय़ावरून सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्तांना घेरण्यासाठी राष्ट्रवादीने शहरात फलकबाजी सुरूकेली आहे. या फलकबाजीमुळे चर्चेविना मंजूर केलेल्या प्रस्तावांविरोधातील आंदोलन केवळ सभागृहापुरतेच मर्यादित न राहता आता राष्ट्रवादी त्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे. तसेच या फलकबाजीतून एक हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला असून या मुद्दय़ावरून सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या जुंपण्याची चिन्हे आहेत.

ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा गेल्या आठवडय़ात शनिवारी पार पडली. या सभेच्या विषय पटलावर ३९२ प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात आले होते. याशिवाय, आयत्या वेळचे ८२ प्रस्तावही मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. हे सर्व प्रस्ताव चर्चेविनाच सत्ताधारी शिवसेनेने मंजूर केल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. याच मुद्दय़ावरून महापालिका मुख्यालयामध्ये भाजपच्या नगरसेवकांनी मंगळवारी धरणे आंदोलन केले होते.

या आंदोलनादरम्यान भाजपने पोस्टरच्या माध्यमातून सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्त यांच्यावर बोचरी टीका केली होती.

त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चेविना मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावांना स्थगिती देण्याची मागणी केली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. त्यापाठोपाठ बुधवारी राष्ट्रवादीने शहराच्या विविध भागांत याच मुद्दय़ावरून फलक लावले आहेत.

प्रश्न विचारण्याची मुभा

‘ठाणे महापालिकेने इतिहास घडवला. ४०० ठराव २० मिनिटांमध्ये पारित. चर्चा नाही, प्रश्न विचारण्याची मुभा नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहातच लोकशाहीचा खून झाला’ असा मजकूर फलकांवर लिहिण्यात आला आहे. याशिवाय, सत्ताधाऱ्यांचा एक हजार कोटींचा झोल, असा उल्लेख करीत शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप राष्ट्रवादीने केले आहे. त्यामुळे चर्चेविना मंजूर झालेल्या प्रस्तावांच्या मुद्दय़ावरून आक्रमक झालेले राष्ट्रवादी आता फलकबाजीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे.