काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या हालचाली सुरू
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये एकमेकांची कोंडी करण्याची स्पर्धा सुरू असताना या दोन पक्षांच्या रणधुमाळीत काहीसे बेदखल झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने या निवडणुकीसाठी एकत्र येण्याची तयारी सुरू केली आहे. या दोन्ही पक्षांच्या किमान १० नगरसेवकांनी आतापर्यंत शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत कल्याण-डोंबिवली परिसरातील मतदारांनी दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांना धूळ चारली, हे लक्षात घेऊन शिवसेना-भाजपला किमान लढत द्यायची असेल तर आघाडीशिवाय पर्याय नसल्याच्या मताशी दोन्ही पक्षांचे नेते आले आहेत.
महिनाभरावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये युती होणार किंवा नाही याविषयी येथील राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत. एकीकडे युतीची बोलणी सुरू करणाऱ्या भाजपने शिवसेनेतील काही दिग्गज नगरसेवकांना गळाला लावण्याची व्यूहरचना आखली असून मिळेल तेथे शिवसेनेची कोंडी करायचे प्रयत्नही सुरू झाले आहेत. डोंबिवलीलगत असलेली २७ गावे महापालिकेतून वगळून भाजपने शिवसेनेची यापूर्वीच कोंडी केली आहे. या घडामोडी लक्षात घेता युती होण्याची शक्यता अत्यंत धूसर असून युती झालीच तर दोन्ही पक्षातून मोठय़ा प्रमाणावर बंडखोरीची शक्यताही व्यक्त केली जात आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महापालिका परिसरातील तब्बल दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना आणि भाजप अशी थेट लढत झाली, तर कल्याण पूर्व मतदारसंघातील अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनीही भाजपची कास धरल्याने तेथेही शिवसेना विरोधकाच्या भूमिकेत आहे.
विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता महापालिका निवडणुकीत या दोन पक्षांचा वरचष्मा राहील असेच काहीसे चित्र पुढे येत असल्याने खडबडून जागे झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा निर्णय जवळपास पक्का केला आहे.

बुधवारी विशेष बैठक
काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील तब्बल १० नगरसेवकांनी आतापर्यंत शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ही गळती रोखण्यात या पक्षांना काही प्रमाणात यश आले असले तरी स्वतंत्रपणे निवडणूक लढविणे सोपे नाही, याचे भान दोन्ही काँगेसच्या स्थानिक नेत्यांना आले आहे. त्यामुळे आघाडीसंबंधीची प्राथमिक बोलणी उरकल्यानंतर दोन्ही काँग्रेसचे नेते बुधवारी सकाळी गांधी भवन येथे भेटणार आहेत. कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना-भाजपच्या भोंगळ कारभाराला जनता कंटाळली असून त्याविरोधात एकत्रपणे लढण्याची आवश्यकता असल्याने आघाडीसाठी सकारात्मक पावले उचलली जात आहेत, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सचिन पोटे यांनी दिली. राष्ट्रवादीचे माजी खासदार संजीव नाईक यांनीही आघाडीसंबंधीच्या वृत्ताला दुजोरा दिला.