मराठी विज्ञान परिषदेचे डॉ. बाळ फोंडके यांचे मत
गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेला ‘नीट’ वाद अत्यंत दुर्दैवी असून ही परीक्षा होणे गुणवत्तेच्या दृष्टीने गरजेची आहे. भविष्यातील प्रगतीचे स्त्रोत उंचावणार असतील तर नीटला विरोध करणे चुकीचे आहे, असे मत मराठी विज्ञान परिषदेचे डॉ बाळ फोंडके यांनी व्यक्त केले. बदलापूरातील एका कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मराठी विज्ञान परिषद आणि युवराज प्रतिष्ठान बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञान गंगा’ या मालिकेतील ‘टेक्नोव्हिजन २०३५’ या विषयावर डॉ. बाळ फोंडके यांचे अभ्यास पूर्ण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी विज्ञान आणि विकास या मुद्दय़ावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
जैविक तंत्रज्ञान अधिक विकसनशील करुन देशाची प्रगती कशी साध्य करता येईल यासाठी २०३५ वर्षांचे उद्दिष्ट समोर ठेवून डॉ. बाळ फोंडके यांनी संकल्पना व आराखडा निश्चित केला आहे. तसेच माणसांचे अग्रहक्क या विषयी सचित्र आराखडाही त्यांनी यावेळी मांडला. त्यात स्वच्छ हवा आणि स्वच्छ पाणी, अन्न व पोषण सुरक्षितता, वीज उपलब्धता, आल्हाददायक निवास, दर्जेदार शिक्षण व रोजगाराची हमी, सर्वाना समान आरोग्य सेवा, नैसर्गिक संपत्ती, नैसर्गिक आपत्तीत पुनर्वसन, प्रतिकुल हवामान आणि तापमान संरक्षण, सुरक्षित तसेच वेगवान वाहतूक, सार्वजनिक व राष्ट्रीय सुरक्षा या नागरिकांच्या प्रमुख गरजा असून त्याबाबतचे २०३५ साठीचा त्यांचा आराखडा त्यांनी यावेळी सादर केला. यासाठी फक्त सरकार काही करेल अशी अपेक्षा न ठेवता समाजानेही सामाजिक बांधिलकी जपून कार्य करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
हवामान खात्याबाबत बोलताना ते म्हणाले, भारतीय हवामान खात्याचा अंदाज अचूक असल्याचे सिद्ध झालेले आहे. मात्र आपल्याकडे हवामान खात्याला नाहक बदनाम केले जाते. आपण केवळ मान्सूनच्या वेळीच असे अंदाज घेत असतो. मात्र हे खाते बाराही महिने कार्यरत आहे, असे सांगून त्यांनी हवामान खात्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन केले आहे.