पावसाळ्यापूर्वीच गटारांची दूरवस्था; स्थानिक रहिवाशांकडून आरोपांच्या फैरी

पावसाचे पाणी वेगाने शहराबाहेर जाण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या गटारांची पावसाळ्यापूर्वीच दुरवस्था होण्याचा प्रकार कल्याण पश्चिमेत घडू लागला आहे. त्यामुळे शहरात सध्या सुरू असलेल्या गटारांच्या दर्जाविषयी शंका निर्माण होऊ लागली आहे.   अनेक भागामध्ये पावसाळ्यापूर्वी महिनाभर आधी ही गटारे तयार करण्यात आली असून त्याची दूर्दशा झाल्याने त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. अनेक ठिकाणी स्थानिक नागरिकांनी गटारांच्या कामांविषयी आक्षेप नोंदवण्यास सुरूवात आहे.

कल्याण शहरात सध्या पावसाळ्यापूर्वीच्या कामांमध्ये गटारांचे काम हात घेण्यात आले आहे. या गटारांची झाकणे, लाद्यांची दुरवस्था होणे, गटारावरील गाळ जसाच्या तसा असताना त्यावर सुशोभिकरणाचा मुलामा चढवणे, असे प्रकार या भागात सर्रासपणे सुरू आहेत. त्यामुळे अशा गटारांवरून चालणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखा प्रकार सध्या कल्याण शहरात निर्माण झाली आहे.

शहरातील गटारांवर बांधण्यात येणाऱ्या भिंतीच्या निकृष्ट दर्जामुळे सोमवारी वसई स्थानकात घडलेली घटना ताजी असताना असेच प्रकार कल्याण शहरात प्रत्येक ठिकाणी घडण्याची शक्यता निर्माण होऊ लागली आहे.  त्याचा फटका पावसाळ्यामध्ये सामान्य नागरिकांना सहन करावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कल्याण पश्चिमेतील ब प्रभाग क्षेत्रात जुने गटार तोडून त्या जागी नवे गटार बांधण्यात आले. मात्र हे गटार पुढे अर्धवट तोडून चक्क मलनिस्सारण वाहिनीला जोडल्याने येथील भागामध्ये पावसाळ्यामध्ये मलनिस्सारण वाहिनी तुंबण्याची शक्यता निर्माण झाले आहे. स्थानिकांनी याप्रकरणी आवाज उठवल्यानंतर त्यांना तात्काळ दुरूस्तीचे आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती जैसे थे अशीच राहत असल्याचा नागरिकांना अनुभव आहे. कल्याण शहरातील पूर्व आणि पश्चिम या दोन्ही बाजूंकडील परिस्थिती सारखीच असून अनेक ठिकाणी गटारांची कामे करताना कमालीची दर्जाहिन कामे केली जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.  याबाबत महापालिकेने दखल घ्यावी आणि दोषी कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

केवळ मुलामा देण्याचे काम

कल्याण पश्चिमेतील ब प्रभाग क्षेत्राचा भाग असलेल्या छोटा म्हसोबा मंदिरा जवळील महिनाभरापासून रस्त्यांवर गटारांचे काम सुरू आहे. प्रत्यक्षात हे संपूर्ण गटार उंदीर आणि घुशींनी आतून पोखरून काढलेले आहे. या गटारामध्ये गाळ साचलेला आहे तो न काढता जुन्या लाद्या काढून नवीन लाद्या बसवण्याचे काम करण्यात आले. या कामाच्या दर्जा संदर्भात प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या भागामध्ये लाद्या लावत असताना जुन्या गटाराच्या भिंतींना सिमेंटचा मुलामा चढवला जात असल्याचेही स्पष्ट झाले असल्याने येथील स्थानिक नागरिकांनी आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

देशातील महत्वाच्या शहरांमध्ये समावेश होऊ पाहणाऱ्या कल्याण-डोंबिवली शहराचा प्रवास स्मार्ट सीटीकडे सुरू असला तरी आजही शहरातील गटारे, नाल्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. पावसाळ्यापुर्वी बांधण्यात आलेली ही दर्जाहीन गटारे पावसाळ्यात वाहून जातात आणि पुन्हा पुढच्या वर्षी त्याच गटाराच्या पुनर्रबांधणीचे ठेके घेऊन ठेकेदार काम करत असल्याचा प्रकार वारंवार होत आहे. नगरसेवक, ठेकेदार आणि प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या एकत्रित सहभागामुळे नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे.

– योगेश दळवी, सामाजिक कार्यकर्ते