ठाणे पोलीस दलाच्या ताफ्यात गुरुवारी ४५ नव्या गाड्या दाखल झाल्या. यामध्ये ३५ छोट्या तर १० मोठ्या गाड्यांचा समावेश आहे. अत्यंत सुसज्ज असलेल्या या गाड्यांची किंमत ८२ लाख इतकी आहे. प्रत्येक वाहनात चार पोलीस कर्मचारी दिवस-रात्र ठेवण्यात आले आहेत. या नव्या गाडीमधील मोबईल टॅबमुळे घटनेचे फोटो तत्काळ अधिकाऱ्यांपर्यंत पाठविण्यास मदत होणार आहे. नवीन वाहनामुळे पोलीस आयुक्तालयातील गाड्यांची संख्या वाढली आहे.

ठाण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर नजर ठेवण्यासाठी नव्या वाहनांमध्ये एक वाहन चालक ४ पोलीस कर्मचारी कार्यरत रहाणार आहेत. तर प्रत्येक पीसीआर मोबईल वाहनामध्ये  १ एसएलआर, गॅसगन, १२ बोअर रायफल, चार लाठ्या, ४ हेल्मेट तसेच चार ढाल, असे साहित्य ठेवण्यात आले आहे.

प्रत्येक वाहनामध्ये मोबाईल जीपीएस यंत्रणेची सुविधा असल्यामुळे वाहनातून गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांशी जलद संपर्क साधणे शक्य होणार आहे. पोलीस ताफ्यातील वाहनामुळे रात्री गस्त घालणे, रस्त्यावर होणारे गैरप्रकार आणि दुर्घटना कमी करणे शक्य होईल, असा विश्वास  राज्य पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी व्यक्त केला.