वयाच्या ७८व्या वर्षीही त्या बसने ठाण्याहून जव्हार तालुक्यात जातात, एवढेच नव्हे तर जवळपास दहा तास रोज काम करतात. दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींच्या जीवनात ऊर्जा निर्माण करण्यासाठी या वयातही त्या जिवाचे रान करतात. पद्मश्री अथवा कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न करता आदिवासींच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा वसा त्यांनी तब्बल तीन दशकांहून अधिक काळ जोपासला आहे. पूर्वाश्रमीच्या ठाणे आणि आता पालघर जिल्ह्य़ाचा भाग असलेल्या जव्हार व मोखाडा क्षेत्रातील आदिवासींना ‘प्रगती’ हा एक मोठा आधार आहे.
वसंतराव पटवर्धन हे ठाणे जिल्ह्य़ातील भाजपचे वजनदार नेते. त्यांनी अनेक सामाजिक कामे उभी केली तसेच त्यांच्या प्रेरणेतून अनेक माणसांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले. त्यांच्या पत्नीने त्यांचा हा वसा जपला नसता तरच नवल. सुनंदा पटवर्धन यांनी आदिवासींमध्ये स्वत:च्या पायावर उभे राहण्याची जिद्द निर्माण केली. आता वयाच्या ७८व्या वर्षीही सुनंदाताईंच्या कामाची तडफ तरुणांना लाजवेल अशीच आहे. मोखाडा व जव्हारमध्ये त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उभे केलेले काम त्याची साक्ष आहे. आजही राज्यातील आदिवासी जिल्ह्य़ांमध्ये शासनाची आरोग्य व्यवस्था पुरेशी सक्षम नाही. सत्तरच्या दशकात ‘प्रगती प्रतिष्ठान’च्या माध्यमातून ठाणे जिल्ह्य़ातील आदिवासी पाडय़ांमध्ये आरोग्य सेवा देण्याचे काम सुरू करण्यात आले. एका झोपडीमधून डॉक्टरच्या साहाय्याने रुग्णसेवा सुरू करण्यात आली. त्यातूनच आदिवासींच्या वेगवेगळ्या समस्या व गरजांचा विचार करून त्यांच्या विकासाच्या सूत्रबद्ध कामाला सुरुवात झाली. त्यातून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या योजना, सौर ऊर्जा पंप, शेतीचे वेगवेगळे प्रयोग, मुलांच्या शिक्षणासाठी वसतिगृह एवढेच नव्हे तर कर्णबधिर मुलांसाठी शाळा सुरू करण्यात आली. गावांमध्ये पथदिव्यांपासून अनेक आदिवासी पाडय़ांतील घरात सौर ऊर्जेवर चालणारे दिवे बसवून आदिवासींच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचे काम ‘प्रगती’ने केले.
१९८५च्या सुमारास कर्णबधिर मुलांसाठी शाळा सुरूकरण्यात आली. शासनाने पन्नास मुलांच्या प्रवेशाची क्षमता निश्चित केली असली तरी जवळपास ७० मुले आज या शाळेत आहेत. आजपर्यंत २६० मुलांना या शाळेतून शिकविण्यात आले. २०१६मध्ये एक नवीन योजना हाती घेण्यात आली. या मुलांना डिजिटल श्रवणयंत्रे देऊन त्यांना बोलायला शिकविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. गेल्या वर्षी चाळीस हजारांचे हे यंत्र दहा मुलांना देण्यात आले, तर यंदा २५ मुलांना हे यंत्र देण्यात येणार असून माँटेसरीपासून मुलांना बोलायला शिकविण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती सुनंदा पटवर्धन यांनी दिली. खरे तर त्याही पूर्वी म्हणजे १९६८ मध्ये जेव्हा तेथे बससेवाही नव्हती, तेव्हा मुलांचे शिक्षण होण्यात अनेक अडचणी होत्या. त्या लक्षात घेऊन २५ मुलांची क्षमता असलेले वसतिगृह ‘प्रगती’ने सुरू केले. तेथे मुलांना अभ्यासासह सर्व सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्या. आठवी ते दहावीपर्यंत मुलांच्या निवासाची सोय असून आवश्यकता असल्यास अकरावीच्या मुलांनाही तेथे राहता येते. आजपर्यंत अतिदुर्गम भागातील सुमारे आठशे मुलांचे शिक्षण या वसतिगृहामुळे होऊ शकले. येथील काही आश्रम शाळांमध्ये सौरऊर्जेचे दिवे बसविण्यात आल्यामुळे जवळपास साडेआठ हजार विद्यार्थ्यांना त्याचा आजपर्यंत लाभ झाला. खरे तर प्रश्न होता तो शेतीसाठी पाणी व आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा. त्यासाठी सौरऊर्जा पंपाची संकल्पना राबविण्यात आली. यात ‘सिजेंटा फाऊंडेशन’ कृषी तंत्रज्ञानासाठी मोठी मदत केली. अनेक गावांत जेथे एमएसईबीची वीज नाही, तेथे शेतकऱ्यांना जर्मनीवरून सौरऊर्जा पंप मागवून देण्यात आले. यातून शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले, तसेच तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात शेती करता येऊ लागली. येथील शेकडो शेतकऱ्यांच्या घर परिसरात कारली व भेंडीचे पीक घेऊन त्याच्या विक्रीचेही व्यवस्थापन निर्माण करण्यात आले. महिलांना दोन ते पाच किलोमीटर अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागते हे लक्षात घेऊन अनेक आदिवासी पाडय़ांमध्ये नळपाणी योजना राबविण्यात आल्या असून त्यासाठीही सौरऊर्जेचा वापर करण्यात येत आहे. याचा तसेच जलसंधारणातून शेतीचा लाभ हा जवळपास पाच हजार कुटुंबांना होत आहे. यासाठी ३३ बंधारेही बांधण्यात आले आहेत. अर्थात सौरऊर्जा पंप देऊन शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविताना त्यांच्यातील सामाजिक जाणिवांचा विकास करून त्यांच्या उत्पन्नातील काही भाग घेऊन पुढील गावांना अथवा त्यांना गरजेनुसार नवीन सौरऊर्जा पंप देण्याची योजनाही राबविण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी जमा केलेली वर्गणी बँकेत जमा करून त्यातून नवीन पंप खरेदी करण्याचे काम केले जाते.
अशुद्ध पाण्यामुळे होणारे जलजन्य आजार लक्षात घेऊन शुद्ध पाणी व स्वच्छतागृहांचा प्रश्न सोडविण्याची योजना आगामी काळासाठी तयार करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात एका गावात शुद्ध पाण्याचा प्रकल्प राबविण्यात आला असून पारंपरिक पद्धतीने शुद्ध पाण्याच्या निर्मितीचा अभ्यास सुरू असून तो प्रयोग यशस्वी झाल्यास पुढील वर्षी अकरा ग्रामपंचायतींमध्ये हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. जव्हार-मोखाडय़ातील सर्व गावांत शुद्ध पाणी देण्याचा आमचा संकल्प आहे. त्यात शासनाने काही मदत केली तर ठीकच, अन्यथा आमची संस्था हेही काम निश्चितपणे करून दाखवेल. यातून जलजन्य आजारांचे प्रमाण खूप कमी होईल, असा विश्वास सुनंदाताईंनी व्यक्त केला. माझ्याबरोबर अनिल डिंगोरे, लक्ष्मण, काशीनाथ जाधव तसेच डॉ. अनुजा पुरंदरे यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते तळमळीने काम करत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
येत्या दोन महिन्यांत पालघरमधील सात तालुक्यात कृषी प्रशिक्षण योजनाही राबविण्यात येणार आहे. शेतीमधून माणूस उभा करणारी ही योजना आहे. आमच्याप्रमाणेच आणखीही लोक पुढे आले तर आदिवासी समाजाचे प्रश्न सुटतील. तीही माणसेच आहेत. त्यांचे प्रश्न सुटणे गरजेचे आहे. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. अन्यथा देशातील अनेक जिल्ह्य़ांमध्ये जसा नक्षलवाद पसरला आहे, तसा उद्या ठाणे-पालघर जिल्ह्य़ातील या आदिवासी भागातही निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, हे सुनंदा पटवर्धन यांचे विधान त्यांची सामाजिक बांधिलकी दाखवून देणारे जसे आहे तसे वास्तवाचा जळजळीत आविष्कार व्यक्त करणारेही आहे.
प्रगती प्रतिष्ठान, ठाणे
अनिल डिंगोरे-९४२२६६४९१६

Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित
religious activities by bjp workers for victory of lok sabha candidate sudhir mungantwar
चंद्रपूर : विजयासाठी धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून देवालाच साकडे!