स्वच्छ ठाणे.. सुंदर ठाणे..हरित ठाणे..अशा घोषणा देत तुमचा परिसर स्वच्छ ठेवा यांसारखी आवाहने ठाणे महापालिकेमार्फत वारंवार केली जात असली तरी सर्वाधिक गर्दीच्या ठरलेल्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एकही कचराकुंडी अस्तित्वात नसल्याची धक्कादायक माहिती पुढे येऊ लागली आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील सॅटीसच्या आवारातील कचरा कुंडय़ांमध्ये टाका असे आवाहन करणारे फलक महापालिकेने जागोजागी लावले आहेत. दरम्यान, कचरा फेकण्यासाठी कचराकुंडीचा शोध घेणाऱ्या प्रवाशांच्या पदरी मात्र निराशाच पडत असल्याचे चित्र आहे. याविषयी ठाण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुयश प्रधान यांनी महापालिकेने रेल्वे स्थानक परिसरात उपलब्ध करून दिलेल्या कचरा कुंडय़ांची माहिती विचारली असता शहर विकास विभागाकडे अशी माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर महापालिका प्रशासनाने दिले आहे.
ठाणे शहरातील स्वच्छतेसाठी महापालिकेच्या वतीने अनेक वर्षांपासून निरनिराळ्या योजना राबविण्यात येत आहेत. तसेच नागरिकांना विविध माध्यमातून स्वच्छतेसाठी आवाहन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानामुळे  अनेक राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी शहरातील स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरले होते. महापालिका अधिकाऱ्यांनीही स्वच्छ भारत उपक्रमासाठी रस्त्यावर उतरून स्वच्छता करण्याचे कार्यक्रम आखले होते. ठाण्याचे महापौर संजय मोरे स्वत हातात झाडू घेऊन वेगवेगळ्या प्रभागांमध्ये स्वच्छतेसाठी दौरे काढताना दिसले मात्र, अशा प्रकारे स्वच्छतेसाठी काही काळ काम केल्यानंतर या उपक्रमाकडे हळूहळू कानाडोळा होऊ लागला आहे. महापालिकेकडून तर केवळ घोषणाच होत असून प्रत्यक्ष कृतीकडे मात्र दुर्लक्षच होत असल्याचे दिसून येत आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांना आवाहन करणाऱ्या फलकांचे अनावरण विविध भागांमध्ये करण्यात आले आहे. त्यामध्ये ठाणे रेल्वे स्थानक परिसराचा समावेश असून परिसरातील सॅटीस स्कायवॉकवरही महापालिकेच्या वतीने कचरा कुंडय़ांमध्ये कचरा टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जागोजागी अशा प्रकारचे फलक झळकत आहेत. मात्र या फलकांजवळ सोडा पण परिसरामध्ये एकाही ठिकाणी कचराकुंडय़ाची व्यवस्था केल्याचे दिसून येत नाही. साडेसात लाखांहून अधिक प्रवासी ठाणे स्थानकातून प्रवास करत असून त्यांच्याकडील खाण्याचे पदार्थ, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक यांचा कचरा होत असतो. हा कचरा टाकण्यासाठी प्रवाशांकडून कचराकुंडय़ांचा शोध घेतला जातो. त्यावेळी स्थानक परिसरात कोणत्याही प्रकारची कचरा कुंडी प्रवाशांना दिसून येत नाही. अशा वेळी रेल्वे स्थानकातील कचरा कुंडय़ांमध्ये, नाल्यामध्ये अथवा रेल्वे रुळावर कचरा टाकून ही मंडळी शांत होतात. रेल्वे स्थानक परिसातील बाहेरील बाजूस मात्र कोठेही कचरा कुंडय़ा दिसून येत नाही. या भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ही खंत व्यक्त केली जाते.

शहर विकास विभागाकडे माहिती उपलब्ध नाही..
ठाण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुयश प्रधान यांनी महापालिकेकडे रेल्वे स्थानक परिसरात महापालिकेच्यावतीने नुकत्याच बसवण्यात आलेल्या कचरा कुंडय़ांची माहिती विचारली होती. त्यासाठी झालेल्या खर्चाची तसेच पुढील वर्षीच्या कचरा कुंडय़ासाठीच्या तरतुदीची विचारण करण्यात आली होती. यावर अशा प्रकारची माहिती शहर विकास विभागाकडे उपलब्ध नसल्याने आपणास माहिती देता येणार नसल्याचे उत्तर महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील कचरा कुंडय़ामध्ये कचरा टाकण्याचे आवाहन केले जात असताना कचरा कुंडय़ांची मात्र व्यवस्थाच नसल्याचे स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रिया सुयश प्रधान यांनी ‘लोकसत्ता ठाणे’शी बोलताना दिली.