साठेबाजांवर मोठय़ा प्रमाणावर कारवाई सुरू झाल्याने घाऊक बाजारात डाळींचे दर कमी झाल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जात असला तरी घाऊक बाजारातील ही स्वस्ताई अजूनही सर्वसामान्यांच्या पदरात पडत नसल्याचे चित्र दिसू लागले आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी येथील घाऊक बाजारात मागील पंधरवडय़ाच्या तुलनेत तूर, मूग आणि उडीद डाळीच्या किमती किलोमागे १५ ते २० रुपयांनी कमी झाल्या असल्या तरी किरकोळ बाजारात अजूनही दर चढेच असल्याचे चित्र आहे.

’मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येणाऱ्या वाशी येथील घाऊक बाजारात मंगळवारी उत्तम प्रतीची तूरडाळ १७० रुपये, उडीद डाळ १६० तर मूगडाळ ११० रुपये किलो या दराने विकली जात होती.
’गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत घाऊक बाजारात तूरडाळ किलोमागे २५ रुपयांनी कमी झाली असली तरी किरकोळीच्या बाजारात तिचे दर अजूनही २०० रुपयांच्या आसपास आहेत.
’मुंबई, ठाण्याच्या किरकोळ बाजारात उत्तम प्रतीची उडीद डाळ १८०, तर मूगडाळीची १३० रुपये किलो या दराने विक्री होत असल्याचे चित्र आहे.