रिक्षाचालकाकडून असभ्य वर्तन होण्याच्या भीतीने तरुण मुलींनी धावत्या रिक्षातून उडी घेतल्याच्या दोन घटनांनी ठाणे शहरातील महिलांच्या सुरक्षित रिक्षा प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. याच पाश्र्वभूमीवर रिक्षाचालकांची माहिती देणारी ‘स्मार्ट आयडी कार्ड’ यंत्रणा सर्व रिक्षांत बसवण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला. परंतु, आजघडीला शहरात तब्बल १५ हजार बेकायदा रिक्षा धावत असून त्यांना ही
यंत्रणा बसवताच येणार नसल्याने महिला प्रवाशांची सु‘रिक्षा’ धोक्यातच आहे.
 ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने आखलेली ‘स्मार्ट कार्ड’ची ही योजना केवळ अधिकृत रिक्षांकरिता लागू करण्यात आली आहे. तसेच रिक्षाचालकांवर या योजनेची सक्ती करण्यात आलेली नाही. अधिकृत परवाना असलेले रिक्षाचालक स्मार्ट कार्ड योजनेमध्ये सामील होत असले तरी शहरातील बेकायदा रिक्षांवर या यंत्रणेचे नियंत्रण येणे अशक्य आहे. स्मार्ट कार्ड योजनेत सहभागी होणाऱ्या रिक्षाचालकांची कागदपत्रे पाहूनच त्यांची स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली जात आहे. यामुळे बेकायदेशीर रिक्षा शोधण्यास मदत होईल, अशी आशा पोलिसांकडून व्यक्त केली जात होती. मात्र, जुन्या रिक्षांचे परमिट नवीन रिक्षांवर नोंदवतानाच रिक्षामालकांनी जुन्या रिक्षाही विनापरमिट सुरू ठेवल्या आहेत. असे रिक्षाचालक/मालक ‘स्मार्ट कार्ड’ योजनेसाठी पुढे येत नाहीत.
ठाणे शहरात सुमारे २५ हजार अधिकृत रिक्षा धावतात. त्या मानाने प्रवाशांची मागणी जास्त असल्याने बेकायदा रिक्षांनाही आयते कुरण मिळाले आहे. शहरात आजघडीला १५ हजार रिक्षा बेकायदा असल्याचे आढळून आल्या आहेत. एकाच क्रमांकाच्या दोन ते तीन रिक्षा यापूर्वी सापडल्याने शहरात अनधिकृत रिक्षा असल्याचे अनेकदा अधोरेखित झाले आहे. मध्यंतरी ठाणे पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने आठ बोगस रिक्षा पकडल्या होत्या. यामध्ये एका स्वयंघोषित रिक्षा युनियनच्या अध्यक्षाला अटक करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर कारवाई थंडावल्याने बेकायदा रिक्षा पुन्हा जोरात धावत आहेत.  
नीलेश पानमंद, ठाणे

’सहा महिन्यांपूर्वी स्वप्नाली लाड या तरुणीने रिक्षाचालकाचा अपहरणाचा डाव ओळखून धावत्या रिक्षातून उडी घेतली होती. त्यामध्ये ती गंभीररीत्या जखमी झाल्याने तिच्यावर महिनाभर रुग्णालयात उपचार सुरू होते.
’गेल्या आठवडय़ात रत्नागिरीहून ठाण्यात आलेल्या दोन तरुणींनी स्वत:च्या बचावासाठी रिक्षातून उडी घेतल्याचा प्रकार घडला.

ठाणे शहरातील महिलांच्या सुरक्षित प्रवासाकरिता स्मार्ट कार्ड योजना राबविण्यात येत असून या योजनेत अधिकृत रिक्षांची नोंदणी करण्यात येत आहे. ही योजना सक्तीची झाली तर शहरातील अनधिकृत रिक्षा पकडणे अधिक सोपे जाईल.
डॉ. रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त – वाहतूक शाखा

या स्मार्टकार्डमध्ये बारकोड प्रणाली वापरली जाते. सेल्फ जर्नी नावाने अ‍ॅप्स मोबाइलमध्ये डाऊनलोड करून त्याद्वारे स्मार्ट कार्ड वापरता येते. मोबाइल या स्मार्टकार्डसमोर धरले, की त्यात रिक्षा चालकांचे छायाचित्र, नाव, पत्ता, परवाना क्रमांक आदी माहिती ग्राहकाला मिळू शकते.