ठाणे जिल्ह्य़ातील पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी नियोजनासाठी सुरू करण्यात आलेल्या पाणीकपातीचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होऊ लागले आहे. यापूर्वी बुधवारपासून शुक्रवापर्यंत होणारी पाणीकपात आता शनिवार, रविवारी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आता सुटीच्या दिवशी ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने होणारा पाणीपुरवठा दर शनिवार व रविवार ठेवण्यात येणार आहे, तर स्टेमचा पाणीपुरवठा शनिवारी पूर्ण दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे शहरात सुट्टीच्या दिवशी पाणीकपातीचे संकट निर्माण होणार आहे.
शुक्रवार, ५ फेब्रुवारी रोजी रात्री १२ ते रविवार, ७ फेब्रुवारी रोजी रात्री १२ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत कळवा, विटावा, मुंब्रा, दिवा, शिळ, कौसा, डायघर, देसाई, इंदिरानगरमधील रुपादेवीपाडा व वागळे फायर ब्रिगेड या परिसराचा पाणीपुरवठा ४८ तास बंद राहणार आहे. स्टेम पाणीपुरवठा कंपनीकडून होणारा पाणीपुरवठाही काही ठिकाणी दोन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री १२ ते रविवारी रात्री १२ पर्यंत जेल, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, उथळसर, साकेत, महागिरी, नौपाडा, पाचपाखाडी व कळव्याचा काही भाग या परिसराचा पाणीपुरवठा ४८ तास बंद राहणार आहे. तर इंदिरानगर, गांधीनगर, श्रीनगर, समतानगर, टेकडी बंगला, घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा या परिसराचा पाणीपुरवठा शुक्रवारी रात्री १२ ते शनिवारी रात्री १२ पर्यंत २४ तास बंद राहणार आहे. त्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे ठाणे महापालिकेने म्हटले आहे.